उष्म्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:50+5:302021-04-30T04:44:50+5:30
लाखांदुर : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. एप्रिल महिन्यातच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली ...
लाखांदुर : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. एप्रिल महिन्यातच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केली असून पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे.
गतवर्षी समाधानकारक पावसाळा झाला होता. त्यामुळे यंदा उन्हाची तीव्रता कमी जाणवेल, असा अंदाज होता. मात्र, महिनाभरापासून उन्हाचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे जनावरांसाठी साठवण करून ठेवलेला चारा खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न ऐरणीवर आला होता. एप्रिलमध्येच चारा आणि पाणीटंचाई भासत असल्याने येत्या मेपर्यंत भयावह परिस्थिती निर्माण हाण्याची भीती आहे. पाण्यासाठी पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नदी-नाले आटल्याने विहिरीचे पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. दुथडी भरून वाहणारी चुलबंद नदी यंदा कोरडी पडली आहे. याचा फटका चुलबंद नदीकाठावरील नागरिकांसह पशुंनादेखील बसत आहे. नदीकाठावरील बऱ्याचशा गावांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नदी पात्रातून केली आहे. येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनादेखील भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे.