जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या पशुपालकांच्या समस्या
By admin | Published: February 2, 2017 12:17 AM2017-02-02T00:17:40+5:302017-02-02T00:17:40+5:30
निसर्गाचा अवकृपेमुळे मागील काही वर्षांपासून शेती व्यवसाय अडचणीत आला आहे.
मानेगाव येथे भेट : शेतीपुरक व्यवसायावर केले मार्गदर्शन
भंडारा : निसर्गाचा अवकृपेमुळे मागील काही वर्षांपासून शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने शेतीसोबत पशु पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक प्रगती करावी यावर शासन भर देत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मानेगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील सुमारे १५० पशुपालक शेतकऱ्यांशी हितगुज केले.
मानेगाव (बा.) पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ ला जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी भेट दिल्यानंतर पशु पालकांशी संवाद साधला. या संवादात गावातील १५० पशुपालक उपस्थित झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी असलेल्या या पशुपालकांना येणाऱ्या अडचणींबाबद चर्चा केली. सुमारे दोन तास पशुपालकांशी मनमोकळ्या गप्पा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पशुपालकांसमोर असलेल्या अडचणींवर मात करण्याच्या उपाय योजनांची माहिती दिली.
पशुपालन विभागाच्या वतीने शेतकरी व पशुपालकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी पशुपालकांना केले. यावेळी त्यांनी आयएसओ मानांकित पशुवैद्यकिय दवाखान्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांच्याशी चर्चा करुन येणाऱ्या अडचंणीबाबद मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त किशोर कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजु शहारे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी बडे या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मानेगाव येथील गुलाब चोपकर या शेतकऱ्याच्या घरी भेट देवून दुग्ध व्यवसायासंदर्भात माहिती जाणून घेतली.
दरम्यान त्यांनी दूध काढण्याच्या अत्याधुनिक मशिनचे प्रात्याक्षिक बघितले. जिल्हाधिकारी यांनी ग्रामस्थ व पशुपालकांची गप्पा करुन समस्यांवर उपाय सुचविल्याने ग्रामस्थ भारावले. त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या समोरील अडचणी मांडल्या. यावेळी सरपंच प्रभाकर बोदेले, जगदिश निंबार्ते, नत्थुजी बांते यांच्यासह पशुवैद्यकिय दवाखान्यातील कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)