शिवाजीनगरात समस्याच समस्या, नगर परिषदेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:54 AM2019-05-27T00:54:28+5:302019-05-27T00:55:08+5:30
ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
लक्ष्मीकांत तागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे अनेक कॉलनी तयार होत आहेत. या शहराला लागून असलेल्या व नव्याने पवनी नगर परिषद हद्दीत समावेश झालेल्या शिवाजी नगरात मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे.
नगर परिषदेने येथील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल केला आहे. पण पिण्याचे शुद्ध पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे या मुख्य सुविधा दिल्या नाहीत. नाल्या नसल्यामुळे सांडपाणी जागोजागी जमा होत आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा होत आहे. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा प्रश्न येथील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
पवनी शहरात बसस्थानकाजवळ निलज, कारधा राज्यमार्ग क्रमांक २४१ ला लागून शिवाजी नगर वसले आहे. या नगरातील सुंदर, अद्यावत इमारतींनी या नगरासोबतच पवनी शहरालाही सुंदर केले आहे. या नगराजवळून गोसीखुर्द धरणाचा उजवा कालवा वाहतो. शिवाजी नगराजवळूनच पवनी शहरातील जनता सकाळी-संध्याकाळी फिरायला जाते. येथे कोणीही सर्वप्रथम आल्यास प्रथम पसंती त्यांची शिवाजीनगर असते. पण शिवाजीनगर जरी सुंदर दिसत असले तरी येथील नागरिक अनेक समस्यांशी झुंजत आहेत. पावसाळ्यात येथे प्रवेश करताच चिखलमय रस्त्यांतून मार्ग काढावा लागतो. दुचाकी वाहनांना सांभाळूनच गाडी चालवावी लागते. येथे पक्के रस्ते नाहीत. या नगराचा समावेश अगोदर बेटाळा ग्रामपंचायतमध्ये होता. येथे अनेक समस्या आहेत. त्यामुळेच येथील नागरिकांनी पवनी न.प. मध्ये समावेश करण्याची मागणी केली. त्यानंतर नगरपरिषद हद्दवाढीमध्ये शिवाजी नगराचा समावेश पवनीत झाला. न.प. ने मोठ्या प्रमाणात येथून कर वसुली केली पण समस्या सोडविल्या नाही. येथे अनेक ठिकाणी पथदिव्यांची, नाल्यांची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस घराबाहेर निघणे धोक्याचे आहे. विषारी सरपटणाऱ्या जीवांचा धोका आहे.
नाल्या नसल्यामुळे जागोजागी सांडपाणी जमा झाले आहे व रस्त्यावरूनही वाहत जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विषाणूजन्य ताप हे येथील जनतेसाठी नेहमीचे झाले आहे. येथील जनतेने अनेक वेळा नगरपरिषदकडे लोकप्रतिनिधींकडे समस्या मांडल्या. पण दुर्लक्ष होत आहे. याच समस्या शेषनगर, न्यू शेषनगर, वैभवलक्ष्मी नगर, प्रेमनगर यांच्याही आहेत.