कुटुंबाच्या सहकार्याशिवाय प्रगती अशक्य
By admin | Published: March 22, 2016 12:49 AM2016-03-22T00:49:36+5:302016-03-22T00:49:36+5:30
कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळेच कोणतीही स्त्री जीवनात प्रगती करु शकते. यासाठी पुरुषवर्गाने मुला-मुलीत भेद न करता त्यांना सतत प्रोत्साहन द्यावे,..
महिला जागृती मेळावा : मंजुषा ठवकर यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळेच कोणतीही स्त्री जीवनात प्रगती करु शकते. यासाठी पुरुषवर्गाने मुला-मुलीत भेद न करता त्यांना सतत प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन भंडारा येथील गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.
फेस्काम व ज्येष्ठ नागरिक संघ जवाहरनगरच्यावतीने गायत्री शक्तीपीठ राजेदहेगाव जवाहरनगर येथे महिला जागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी माजी अप्पर महाप्रबंधक एम. एस. मस्के, नागरिक संघाचे अध्यक्ष दिनेश वसाणी, संघमित्र मस्के, संघाचे सचिव डॉ. चंद्रमोहन गुप्ता, यशोदा फटींग, प्रतिभा कामडी, अतिया खान उपस्थित होते. यावेळी प्रतिभा कामडी म्हणाले, कुटुंबात स्त्रियांना योग्य मान मिळाला पाहिजे व बालकांना सुसंस्कारीत करणे अगत्याचे आहे, यात आजी-आजोबांचे योगदानही आवश्यक आहे. संघमित्रा मस्के म्हणाले, स्त्रियांना सन्मान द्याल तरच समाज टिकेल व कुटुंबसंस्कृती ही स्त्रीयांनीच जपली आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. संचालन डॉ. चंद्रमोहन गुप्त यांनी तर आभारप्रदर्शन वासुदेव निर्वाण यांनी केले. (वार्ताहर)