दमदार पावसाने रोवणी मजुरांचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:20 AM2017-07-22T01:20:58+5:302017-07-22T01:20:58+5:30
पालांदूर परिसरात पावसाने प्रारंभी पाठ दाखविली होती. तरीही ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे.
मजुरांची टंचाई : बाहेरगावावरून आवक, मजुरी १५० ते २०० रूपये,अनेक ठिकाणी रोवणी अंतिम टप्प्यात
मुखरू बागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : पालांदूर परिसरात पावसाने प्रारंभी पाठ दाखविली होती. तरीही ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशांनी रोवणी आटोपती घेतली. मंगळवारला पावसाने दमदार हजेरी लावली व उर्वरित रोवणी धडाक्यात सुरू झाली.
पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पळाला होता. मात्र, मंगळवारला पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आता कामाला लागले आहे. गावातील महिला मजुर व ट्रॅक्टर कामात लागले असून कोरडवाहूची रोवणी हप्त्याभरात पूर्णत्वाला जाणार आहे. पालांदुरात बाहेरगावरून मजुरांची आवक वाढली असून सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या रोवणीच्या कामाचे १५० ते २०० रूपये मजुरी देण्यात येत आहे.
पालांदूर परिसरातील शेतकरी सुजाणकीला असून शेतीकडे नफ्याच्या दृष्टीने बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन पाठवला आहे. पावसाचा वेध शेतीची मशागत, मंडळ कृषी कार्यालयाशी सलगी, पदवीधर कृषी विज्ञानाशी मैत्री करीत धानशेती अत्याधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न वाढला आहे.
पालांदुर परिसरात रोवणी अधिक स्वरूपात आटोपली असून केवळ १०-१२ दिवसांच्या पऱ्यांची रोवणी केल्याने फुटल्यांची संख्या वाढणार आहे. रासायनिक खतातही सुधारणा करून मृदेचे आरोग्य तपासूनच खतांच्या मात्रा वापरत आहेत.
धानपिकाला लागणारे १६ अन्नघटकांची पूर्तता पूर्ण करण्याचा प्रयत्न मंडळ कृषी कार्यालय व कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून होत आहे. मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांच्या प्रयत्नातून इसापूर, मांगली, मचारणा गावात यांत्रिकपद्धतीने रोवणीचे नियोजन केले असून नर्सरीसुद्धा बेड गादीवाफेवर टाकले आहेत.
शाश्वत शेती समृद्ध शेतकरीचा अभिनव प्रयोगातून कमी खर्चात अधिक नफ्याची धानाची शेती पुढे येत आहे.
बागायती शेतीत भाजीपाल्याची शेती सुद्धा पुढे आली असून पालांदुरचा भाजीपाला थेट इतर राज्यात विकला जात आहे. रोवणीला गती मिळाली आहे.