तहकूब सभांमुळे वाढले भ्रष्टाचाराचे प्रमाण
By admin | Published: June 27, 2016 12:35 AM2016-06-27T00:35:16+5:302016-06-27T00:35:16+5:30
ग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत.
सभेबाबत अनास्था : ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणी
राहुल भुतांगे तुमसर
ग्रामीण विकासासाठी राज्यघटनेने ग्रामसभेला विशेष अधिकार प्रदान केले आहेत. मात्र ग्रामसभेला असणारी उपस्थिती पाहता ग्रामसभेचा हेतू यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत. गणसंख्येअभावी तहकूब होणाऱ्या सभांचे प्रमाण वाढू लागल्याने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.
आजही ग्रामीण भागात बहुतांश नागरीक ग्रामसभेविषयी अनभिज्ञ आहेत. ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभेत काय चालते? ग्रामसभेचे फायदे काय? ग्रामसभेची कार्ये कोणती? यासह अनेक प्रश्न हे ग्रामस्थांनी अजूनही अनुत्तरीतच आहेत. ग्रामस्थांनी निवडून दिलेले सदस्य ग्रामपंचायत चालवत असतात. परंतु ग्रामपंचायत ही मतदारांची संख्या असून ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या गावातील मतदार हे ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेला हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत मांडण्याचा प्रत्येक ग्रामस्थाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास करणे किंवा नाकारण्याचा अधिकार हा ग्रामसभेत हजर असणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला आहे. हे अधिकार बजावणे प्रत्येक ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. ग्रामसभा या आजघडीला सत्ताधारी किंवा विरोधकांना गावपातळीवर श्रेयवादाच्या राजकारणासाठी प्रसिद्ध होवू लागल्या ओत. ग्रामसभेत हजर राहून सुधारणा सूचविण्याऐवजी तसेच टीकाटिप्पणी करून गावातील नेत्यांचा रोष पत्करण्यापेक्षा ग्रामसभेला जाणे टाळण्यातच ग्रामस्थ धन्यता मानत आहेत. काही ठिकाणी पूर्ण बहुमतात असणाऱ्या व गावातील राजकारणात १०० टक्के वर्चस्व असणाऱ्या नेत्यांच्या दहशतीमुळे गावकरी ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचीही वास्तविकता आहे. ग्रामसभेत जे ठराव होतील त्यांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे. परंतु लोकच जर ग्रामसभेला गेलेच नाही तर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा मनमानी कारभार सुरु होतो. कुठे ग्रामसभेच्या आठ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, तर कुठे खोट्या सह्या व अंगठे घेवून सरपंच, ग्रामसेवक ठरवतील असे खोटे ठराव घेवून पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठवून नको तिथे भ्रष्टाचार केला जातो. पदाधिकारी लक्षाधीश बनत चालला आहे व गरीब मात्र गरीबच राहत आहे. त्याचा कुठला विकास होत नाही हे वास्तववादी सत्य असले तरी याला कारणीभूत ती जनताच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.