भंडाऱ्यात बायो इथेनॉलचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:20 AM2017-07-23T00:20:18+5:302017-07-23T00:20:18+5:30

धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.

Proposal of bio-ethanol in the reservoir | भंडाऱ्यात बायो इथेनॉलचा प्रस्ताव

भंडाऱ्यात बायो इथेनॉलचा प्रस्ताव

Next

फुके यांचा पुढाकार : मुखमंत्र्यांचा पेट्रोलियम मंत्र्यांकडे पाठपुरावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. धानाला भाव नाही, मजुरीचे दर गगनाला भिडलेले असताना धानपिकानंतर निघणारे तणस चाऱ्यासाठी तर कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. अशा स्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, त्यातून उद्योग निर्माण करता यावा, यासाठी भंडारा जिल्ह्यात बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
तणसापासून बायो ईथेनाल प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्राने यापूर्वीच पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत देशात ११ ठिकाणी बायो-ईथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. सुमारे ५०० ते ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत आयओसीएलचा पानीपत (हरीयाणा), दहेज (गुजरात), बीपीसीएलचा बारगढ (पंजाब), कोची (केरळ) आणि एचपीसीएलचा भटिंडा (पंजाब) अशा पाच ठिकाणी सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात असा प्रकल्प झाला तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मितीसोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी मदत होऊ शकते. या प्रकल्पासाठी सुमारे ५० एकर जागा अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रीक टन जैविक खत तयार होऊ शकते असा हा प्रकल्प राहणार आहे.
मागील काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत अत्यल्प पाऊस बरसला आहे. मागीलवर्षी २२ जुलैला ४५८.७ मि.मी. पाऊस बरसला होता यावर्षी ३८१.६ मि.मी. ईतकाच पाऊस बरसला आहे.
आतापर्यंत ५० ते ६० टक्के रोवणी अपेक्षित असताना यावर्षी केवळ कृषीपंप धारक शेतकऱ्यांचीच रोवणी आटोपली आहे. याची टक्केवारी २५ ते ३० ईतकी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत शेतीवर आधारीत उद्योग भंडारा जिल्ह्यात झाला तर असा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार रोजगार
भंडारा जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू झाला तर प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. या प्रकल्पातून वर्षाकाठी ३.२ कोटी लिटर ईथेनॉल, १ कोटी किलो सीएनजी आणि ३२ हजार मेट्रिक टन जैविक खत तयार होऊ शकते.

तणसापासून फारसे उत्त्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते. बायो इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढला तर त्यांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. हा प्रकल्प आपल्या मतदार क्षेत्रात आणण्यासाठी कटीबद्ध आहे.
- डॉ.परिणय फुके, विधान परिषद सदस्य.

Web Title: Proposal of bio-ethanol in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.