महिला रूग्णालयाचा प्रस्ताव शासन दप्तरी अमान्य

By admin | Published: June 4, 2017 12:13 AM2017-06-04T00:13:42+5:302017-06-04T00:13:42+5:30

राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे.

Proposal of Women's Hospital | महिला रूग्णालयाचा प्रस्ताव शासन दप्तरी अमान्य

महिला रूग्णालयाचा प्रस्ताव शासन दप्तरी अमान्य

Next

जागेचा प्रश्न अधांतरी : युती शासनाकडूनही निराशाच
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातील सर्वच जिल्ह्यात स्वतंत्र महिला रूग्णालय असले तरी जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरात मात्र स्वतंत्र महिला रूग्णालयाचा प्रश्न अधांतरी आहे. या रूग्णालयासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असतानाही या बांधकामाचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला, हे विशेष.
राज्यातील शासकीय ईमारतीच्या पाच कोटी रूपयांपेक्षा अधिक किमतीच्या ईमारत बांधकामांना मंजुरी देण्यासाठी विविध विभागांच्या सचिव समितीची बैठक मुंबई येथे मुख्य सचिवांच्या दालनात पार पडली. या बैठकीत सर्वच विभागाच्या ईमारतींच्या बांधकामाचा विषय असल्यामुळे त्या-त्या विभागाचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत वर्धा येथे नियोजन भवनासाठी १७.६७ कोटींचा निधी, चंद्रपूर येथे विक्रीकर भवनासाठी २१.४३ कोटींचा निधी, धुळे येथे आश्रमशाळेसाठी ८.१७ कोटींचा निधी, नगर जिल्ह्यातील राहुरी ग्रामीण रूग्णालयासाठी १७.३२ कोटींचा तर घोडेगाव ग्रामीण रूग्णालयासाठी १२.४९ कोटींचा निधी आणि कोल्हापूर येथे प्रशासकीय ईमारतीसाठी ८.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु भंडारा येथे १०० खाटांचे स्वतंत्र महिला रूग्णालय व नवजात अर्भक केंद्र बांधकामाच्या ४३.८४ कोटी रूपयांच्या अंदाजपत्रक आराखड्याचा विषय या बैठकीत अमान्य करण्यात आला. याशिवाय काही जिल्ह्यातील ईमारत बांधकाम प्रस्तावही या बैठकीत अमान्य करण्यात आला आहे.
मागील आघाडी सरकारच्या कार्यकाळात भंडारा शहरात महिलांसाठी स्वतंत्र रूग्णालय मंजूर झाले होते. तेव्हापासून या रूग्णालयासाठी अद्यापपर्यंत जागा मिळालेली नाही. त्यामुळे या रूग्णालयाची पायाभरणी अद्याप करण्यात आलेली नाही, हे विशेष.
आरोग्य मंत्री गेले कुठे?
भंडारा जिल्ह्यात लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य भंडाऱ्याचे, याशिवाय तीन विधानसभा सदस्य, एक विधान परिषद सदस्य, पदवीधर मतदार संघाचे सदस्य आणि शिक्षक मतदार संघाचे सदस्य अशी भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची लांबलचक यादी असताना भंडाऱ्यात महिला रूग्णालय होऊ नये, ही शोकांतिका आहे.
महिला रूग्णालयासाठी जागेचा शोध घेत आतापर्यंत सच्चिंद्रप्रताप सिंह, डॉ.माधवी खोडे, धीरजकुमार, अभिजीत चौधरी हे जिल्हाधिकारी आले आणि गेले आता सुहास दिवसे हे जिल्हाधिकारी आले आहेत परंतु जागेचा शोध अद्याप लागलेला नाही. या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री लाभले. त्यावेळी जिल्ह्यातील आरोग्याची समस्या मार्गी लागेल असे वाटत होते. परंतु आरोग्य मंत्र्याचे जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न सुटण्यासाठी मात्र कोणताही उपयोग अद्याप झालेला नाही.

Web Title: Proposal of Women's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.