तालुक्यातील २८५ सिंचन विहिरीचे प्रस्ताव रखडले
By Admin | Published: April 20, 2015 12:43 AM2015-04-20T00:43:01+5:302015-04-20T00:43:01+5:30
राज्य शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळावा ...
हरितक्रांतीचे स्वप्न धुसर : लाभार्थी योजनेपासून वंचित
लाखांदूर : राज्य शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ मिळावा याकरिता लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र २८५ सिंचन विहीरीचे प्रस्ताव रखडल्याची बाब उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या विहिरींचे बांधकाम करण्यात येते. शेतीला मुबलक पाणी मिळावे व त्यातून शेतीतील उत्पन्न वाढावे हा मुख्य उद्देश आहे. कोरडवाहू व अल्पभूधारक मात्र शेतकऱ्यांकडून पंचायत समितीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले. जवाहर विहिर योजनेच्या धर्तीवर अनुदानाची रक्कम वाढवून ती एक लाख ९० हजार करण्यात आली आहे. पहिला टप्पा पूर्ण होवून तीन सत्राचा कालावधी लोटूनही तालुक्यातील २८५ पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव थंडबस्त्यात पडून आहेत.
पात्र लाभार्थ्याला विहिरीचा लाभ त्वरित दिल्यास भविष्यात त्यांचा शेतीतून उत्पादन वाढीस मदत होईल. त्यामुळे शासनाने तालुक्यातील रखडलेले प्रस्ताव पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)