समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:20 IST2025-03-04T14:19:00+5:302025-03-04T14:20:35+5:30
राजनी येथे विरोध : शेतकरी बसले उपोषणावर

Prosperity highway debate! Farmers expressed regret that they did not meet the Chief Minister
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर :भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, अशी लेखी मागणी केली होती. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला येथे २ मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे. यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शवून प्रथम शेतीचे दर तसेच अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करावी ही मागणी केली.
निवेदनाची दखल नाही
जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, यासाठी लाखांदूर तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आले होते. मात्र त्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी कोणतीच दखल न घेतल्याने समृद्धी महामार्गातील पीडित शेतकरी विनोद ढोरे यांच्या नेतृत्वात प्रभू मेंढे, जयपाल भांडारकर, व्यंकट बेडेकर, जनार्दन भांडारकर, शिशुपाल भांडारकर, शीतल भांडारकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली
अशा आहेत प्रमुख मागण्या
समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीला प्रतिएकर १ कोटी ३० लाख रुपये भाव मिळावा, अशी या शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १३२१ शेतकरीही याच मागणीवर ठाम असल्याचे सांगण्यात येतेय. महामार्गात शेतजमिन गेलेल्या मालकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करावे. समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतजमिनीच्या मालकांना प्रति महिना ३० हजार रुपये पेन्शन मिळावी.
जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरू
लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. मात्र, सदर रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेतजमिनीचे किंमत किती मिळणार हे अद्यापही शेतकऱ्यांना कळविण्यात आले नसल्याचे १६ जानेवारीच्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते. याशिवाय शासनाने बळजबरीने शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.
अशी आहेत तीन तालुक्यातील गावे
- भंडारा तालुक्यातील गावे : गराडा बू., बासोरा, बोरगाव बु., चोवा, उसरीपार, श्रीनगर, वाकेश्वर, पहेला, चिखलपहेला, गोलेवाडी.
- पवनी तालुक्यातील गावे: २ पन्नाशी, मिन्सी, तिरीं, खैरीतिरी, तांबेखनी, भीवखिडकी, तेलपेंढरी, कातुर्ली, पिलांद्री, खांबाडी.
- लाखांदूर तालुक्यातील गावे : ३ पालेपंढरी, घोडेझरी, पाचगाव, बेलाटी, मासळ, खैरीघर, घरतोडा, सरांडी बू., राजनी, कन्हांडला, डोकेसरांडी, किरमटी, रोहनी, खैरणा, व मोहरणा.
तीन तालुक्यातील ३५ गावांचा समावेश
भंडाराहून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या शीघ्रसंचार दृतगती महामार्गात भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील ३५गावांचा समावेश आहे. यात भंडारा व पवनी तालुक्यातील प्रत्येकी दहा तर लाखांदूर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.
१३२१ शेतकऱ्यांची जमीन दृतगती महामार्गात गेली आहे.
राजनी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या उपोषणाला दोन दिवस लोटले आहेत. याची कुणीही दखल घेतलेली नाही. परिणामी आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.