'त्या' लाठीमाराचा मुख्याध्यापक संघाकडून निषेध
By admin | Published: October 7, 2016 12:52 AM2016-10-07T00:52:40+5:302016-10-07T00:52:40+5:30
विनाअनुदानित शाळा कृती समितीने औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला.
निवेदन : खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मोहाडी : विनाअनुदानित शाळा कृती समितीने औरंगाबाद येथे काढण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यावर पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्या लाठीमाराचा निषेध मोहाडी मुख्याध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कृती समितीने केला. निषेध व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना खंड विकास अधिकारी गजानन लांजेवार यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
कायम विनाअनुदानित व विनाअनुदानित तत्वावर शासन मान्यता दिलेल्या शाळांना व वर्ग तुकड्यांना देण्यासाठी शाळांचे मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकन झाल्यावर अनुदानास पात्र शाळांना अनुदान दिले गेले नाही. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलने केली. त्यानंतर शासनाने १९ सप्टेंबर २०१६ ला निर्णय निर्गमित केला. मात्र शासन निर्णयातून शिक्षकांना वेतनच मिळू नये अशा जाचक अटी लाटून शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे.
त्यासाठी औरंगाबाद येथे विना अनुदानित शिक्षकांनी शांततेने मोर्चा काढला. पण, शासनाच्या दबावाखाली पोलिस प्रशासनाने शिक्षकांचा मोर्चा दडपण्यासाठी लाठीमार केला. त्यात अनेक शिक्षक जखमी झाले. शिक्षकांच्या मोर्च्यावर जो लाठीमार झाला त्याचा निषेध मोहाडी तालुका मुख्याध्यापक संघ व प्राथमिक शिक्षक संघाच्या कृती समितीने केला.
यावेळी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यंचे नावे दिलेल्या निवेदनातून निषेध नोंदवून १९ सप्टेंबर २०१६ चा शासन निर्णय रद्द करा अथवा जाचक अटी काढून टाका तसेच शिक्षकांना तात्काळ अनुदान देण्यात यावे, असे निवेदन मुख्याध्यापक संघाचे गोपाल बुरडे, राजकुमार बांते, प्राथमिक शिक्षक कृती समितीचे अनिल गयगये, किशोर ईश्वरकर, प्रकाश महालगावे, कोमल चव्हाण, विजय चाचेरे, प्रदीप शेंडे, विठ्ठल गभणे, वसंता धांडे, प्रभाकर बांते, संजय भांडारकर, हेमराज राऊत, गजानन वैद्य, हिवराज राऊत, राजू डोये, किशोर चोपकर, गोविंद आव्हाड, मोहन वाघमारे, कमलेश कनपटे, शरद शेंडे, जैपाल चामट यांच्या शिष्टमंडळाने खंडविकास अधिकारी मोहाडी यांना निवेदन सादर केले. (तालुका प्रतिनिधी)