पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी गिट्टी बोल्डर उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:39 AM2021-08-19T04:39:07+5:302021-08-19T04:39:07+5:30
तालुक्यात शासनाच्या विविध योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ४३७ पांदण रस्ते मातीकाम करण्यात आले आहेत. मात्र, एकाही पांदण रस्त्याचे काम पूर्ण ...
तालुक्यात शासनाच्या विविध योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण ४३७ पांदण रस्ते मातीकाम करण्यात आले आहेत. मात्र, एकाही पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नसल्याने शेतकरी जनतेत ओरड आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्यावरील चिखलातून जनतेला ये-जा करावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर शेत मशागतीसह रोवणीपूर्व चिखलणी करताना ट्रॅक्टरने पांदण रस्त्यावरील चिखल माती प्रमुख डांबरीकरणाच्या रस्त्यांवर येत असल्याने धोका वाढला आहे. गिट्टी बोल्डरची चोरी टाळण्यासह तालुक्यातील पांदण रस्त्यांचे मजबुतीकरण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत चप्राड पहाडीवरील रोहयोतून गिट्टी बोल्डर पांदण रस्त्याच्या मजबुतीकारणासाठी उपलब्ध करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर राऊत यांच्या नेतृत्वात या मागणीचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांना देताना माजी जि. प. सदस्य प्रणाली ठाकरे, माजी उपसरपंच गोपाल मेंढे, माजी सरपंच धनराज ढोरे, सरपंच ताराचंद मातेरे, सरपंच जितेंद्र पारधी, मधुकर रोहणकर, ओमप्रकाश सोनटक्के, मुनेश्वर दिवठे, नीलकंठ पारधी, रवींद्र बगमारे, अमर भानारकर, मंगेश राऊत, यशवंत लांडगे, राजू मेश्राम, शशिकांत पत्रे, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.