नागरी सुविधा द्या, नंतरच कर वसुली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:51 PM2019-03-09T21:51:09+5:302019-03-09T21:51:54+5:30
नजीकच्या कारधा येथील एकता नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरटॅक्स द्यायला नकार नाही, परंतु आधी नागरी सुविधा द्या नंतरच कर वसुली करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नजीकच्या कारधा येथील एकता नगर परिसरात नागरी सुविधांचा अभाव असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. घरटॅक्स द्यायला नकार नाही, परंतु आधी नागरी सुविधा द्या नंतरच कर वसुली करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
वाढत्या शहरीकरणासोबतच नागरिकरणाचाही व्याप वाढत आहे. त्याअंतर्गत लहान गावांचे विस्तारीकरणही झपाट्याने होत आहे. याला कारधा गावही अपवाद नाही. कारधा येथील एकता नगर भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी घरी बांधली आहेत. सद्यस्थितीत मार्च महिना असल्याने कारधा ग्रामपंचायतीतर्फे घरकर वसुली मोहीम जोमात सुरु आहे.
दुसरीकडे एकता नगर येथील रहिवाशांना घरटॅक्सच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. घरकर व इतर कर शुल्क वसुलीबाबत पावती देण्यात येत आहे. सन २०१४ पासून प्रथम मोजणीनुसार सर्वांचे घरकर कमी होते. सन २०१५ मध्ये घरकर घेण्यात आले नाही. २०१६ मध्ये कराची मागणी न करता ती रक्कम थकीत ठेवून २०१७ - १८ व २०१९ पर्यंतचे एकमुस्त कराचा भरणा करणे येथील रहिवाशांना अशक्य झाले आहे. परिणामी घरकर डिमांडची रक्कम फुगली असून नागरिकांचे टेंशन वाढले आहे.
विशेष म्हणजे एकता नगर वॉर्ड परिसरात नाली, रस्ते, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बोअरवेल नाही. मूलभूत सुविधांचा वानवा असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र इमाने इतबारे घरकराबाबत डिमांड करीत आहे.
नागरिक सुविधा देण्यात अयशस्वी ठरलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला घरकर का द्यावे असा प्रश्नही येथील नागरिकांनी विचारला आहे. विशेष म्हणजे घरकराची डिमांड पाठविताना त्यावर सही, शिक्का तसेच पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरीही नाही.
पावसाळ्याच्या दिवसात नाल्याअभावी घराच्या सभोवताल पाणी साचत असते. कच्चे रस्ते असल्याने रहदारीला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्या सोडविण्यात याव्यात अशी मागणीही एकता नगरवासीयांनी केली आहे.