बाह्यरुग्ण तपासणीसाठी तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:38+5:302021-07-18T04:25:38+5:30
ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथे येणाऱ्या रुग्णांना अनेक दिवसांपासून सकाळी आयुष डॉक्टरांतर्फेच बाह्यरुग्ण तपासणी केली जात होती. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या ...
ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथे येणाऱ्या रुग्णांना अनेक दिवसांपासून सकाळी आयुष डॉक्टरांतर्फेच बाह्यरुग्ण तपासणी केली जात होती. ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना एमबीबीएस डॉक्टरांची सेवा उपलब्ध होत नव्हती, एक्स-रे मशीन काही दिवसांपासून बंद होते, रुग्णालय आवारात गवत उगवलेले होते, स्वच्छतेचा अभाव होता, कर्मचाऱ्यांचा येण्या-जाण्याचा काहीही ताळमेळ नव्हता. या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. याची दखल घेऊन आमदार राजू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक पंचायत समिती मोहाडीच्या सभागृहात बोलावण्यात आली होती. त्यावेळी आमदारांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना रुग्णालयाचा कारभार उत्तमप्रकारे सुरू राहण्यासाठी काही निर्देश दिले. एक्सरे मशीनची समस्या दोन-चार दिवसांत सोडविण्यात येईल, नियमित एक्सरे टेक्निशियन देण्यात येईल, कर्मचारी नियोजित वेळेत येतील, याची दक्षता घेण्यात येईल, स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल, ऑक्सिजन कान्स्ट्रेसेसन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, औषध निर्मात्याची व युनानी डाॅक्टरची रिक्त जागा त्वरित भरण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही समस्या तात्काळ प्रभावाने सोडविण्यात येतील, असे आश्वासन सभागृहात जिल्हा शल्यचिकित्सक आर. एस. फारुकी व जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा प्रशांत उईके यांनी आमदारांना दिले.
येथे ग्रामीण रुग्णालय असूनही जनतेला त्याचा पाहिजे तसा लाभ मिळत नव्हता. रुग्णालयात अनेक समस्या आहेत. अशा बातम्यांची दाखल घेऊन आमदार कारेमोरे यांनी ही आढावा बैठक आयोजित केली होती.
बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी उईके, वैद्यकीय अधीक्षक चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी मेश्राम यांच्यासह आंधळगाव, जांब, करडी येथील वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथील आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.