तुमसर शहराला दररोज २९ लाख लिटर पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:37 AM2019-05-18T00:37:25+5:302019-05-18T00:38:10+5:30
जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने जलसाठा झपाट्याने खाली जात आहे. सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र तुमसर शहर याला अपवाद ठरले आहे. नगरपरिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाने भर उन्हाळ्यात शहराला दररोज २९ लाख पाणीपुरवठा केला जात आहे. वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा सुरू असून बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्याअनुषंगाने तुमसर नगरपरिषदेने पाणीपुरवठा करण्याची यशस्वी योजना तयार केली.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे नागरिकांना पाणीपुरठा करणे हे प्रथम कर्तव्य आहे. उपलब्ध पाणीसाठा व त्याचा योग्यविनियोग केला तर नागरिकांना उन्हाळ्यातही आवश्यक तेवढे पाणी पुरविता येते, हे तुमसर नगरपरिषदेने यशस्वी करून दाखविले. पाण्याची भीषण टंचाई असताना तुमसर नगरपरिषद दरदिवशी २९ लाख लीटर पाणीपुरवठा शहराला करीत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ११, ९ व सहामध्ये पाणीटंचाई आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२ टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून दीड लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे.
शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात दोन जलकुंभ आहेत. त्यात १३ लाख व नऊ लाख लीटरचे जलकुंभ आहे. दुर्गा कॉलोनीत दीड लाख लीटर, बावनथडी कॉलोनीत अडीच लाख लीटर, नेहरू नगर दीड लाख लीटर, तिलकनगर दीड लाख लीटर जलकुंभ आहे. यातून दररोज एक तास पाणीपुरवठा होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर कवलेवाडा बॅरेडमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग झाला. माडगी व कोष्टी येथे नगरपरिषदेने इन टच वेल तयार करून पात्रातून पाणी विहिरीजवळ वळते केले. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला.
४७ कोटींची पाणीपुरवठा योजना
नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेतून ४७ कोटींच्या योजनेचे तुमसर शहरात काम सुरू आहे. ५० टक्के काम झाले आहे. पुढील उन्हाळ्यापूर्वी १०० टक्के शहराला या योजनेतून पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे टँकरमुक्त शहर अशी ओळख तुमसर शहराची होणार आहे.
तुमसर शहरात नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे. भीषण तापमानामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. पुढीलवर्षी उन्हाळ्यापूर्वी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊन शहर टँकरमुक्त होणार आहे.
-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष तुमसर.