अंधश्रद्धा निर्मूलनाचे जनजागरण
By admin | Published: January 24, 2017 12:36 AM2017-01-24T00:36:10+5:302017-01-24T00:36:10+5:30
टेकेपार पुनर्वसन येथील परमात्मा एक सेवक मंडळ तसेच कारधा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
परमात्मा एक सेवक मंडळ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम
भंडारा : टेकेपार पुनर्वसन येथील परमात्मा एक सेवक मंडळ तसेच कारधा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कारधा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. स्वप्नील गौपाले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील शिवशंकर वंजारी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शारदा बन्सोड, ज्ञानेश्वर कुंभलकर, राजु कुंभलकर, मंगेश लांबट, रामलाल केवट, मानिक वंजारी व महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, लिलाधर बन्सोड तसेच शेकडो सेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पीएसआय गौपाले यांनी समाजात असलेल्या अंधश्रद्धा व अनिष्ठ रूढी, परंपरा व पोलिसाचे कर्तव्य याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे यांनी उपस्थित सर्व परमात्मा एक सेवक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविक वाचून शपथ घेण्यात आली. त्यानंतर नारळातून रिबीन काढणे, हातावर जळता कापूर खाणे, लोखंडी साखळी सोडवणे, कोंबडी समोहीत करणे असे अनेक वैज्ञानिक चमत्कारीक प्रयोग करून कार्यक्रमाची सुरूवात केली. परमपुज्य परमात्मा एक सेवक यांनी व्यसन मुक्त समाज होण्यासाठी व आपल्याला एकजुटीने उभा होण्यासाठी परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली. त्यातून अनिष्ठ रूढी व परंपरा दुर करण्यासाठी हजारो वर्षापासून घरात असलेले देवदिप विसर्जित करण्याची शपथ दिली. म्हणून दारू पिणे सोडून घरात असलेले देव विसर्जित करून परमात्मा एक सेवक या मंडळात एकत्र जमलो हे काम बाबा जुमदेव यांनी केले. परंतु आम्ही या त्यांच्या कामाला व विचाराला बाजूला ठेवून ये वैदा रे वैदा रे व अनेक चमत्कार सांगून अंधश्रद्धा पसरवित आहोत याला आपण आळा घातला पाहिजे.
समाज सुधारण्यासाठी प्रत्येकाने चांगले कार्य केले पाहिजे. कोणाच्याही स्वातंत्र्याचे हनन होवू नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे व असलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा व अंधश्रद्धा दूर सारून समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद याचा प्रत्येकाने प्रसार व प्रचार केला पाहिजे. जगात भूत भानामती, जादुटोना याचे अस्तित्व नाही, जर कुणी जादुटोना, भूत भानामती याचे अस्तित्व सिद्ध करून देत असेल तर त्याला समितीच्या वतीने एकवीस लाख रूपयाचे पारितोषिक देण्यात येईल, जादुटोणा, भूत भानामती, करणी आहे म्हणून प्रसार व प्रचार करीत असेल, समाजात दहशत पसरवित असेल, आर्थिक फसवणूक करीत असेल तर त्याच्यावर जादुटोणा विरोधी कायद्यानुसार कार्यवाही करता येते असे कार्यक्रमातून मार्गदर्शन विष्णुदास लोणारे यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)