वन्यजीवांसाठी जनजागृती आवश्यक
By Admin | Published: April 18, 2015 12:23 AM2015-04-18T00:23:48+5:302015-04-18T00:23:48+5:30
वने, वन्यजीव, नद्या अशा नैसर्गिक स्त्रोताचे जतन करणे काळाची गरज झाली आहे.
कार्यशाळा : जी.जे. अकर्ते यांचे प्रतिपादन
भंडारा : वने, वन्यजीव, नद्या अशा नैसर्गिक स्त्रोताचे जतन करणे काळाची गरज झाली आहे. मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे नैसर्गिक स्त्रोताचा ऱ्हास होतो आहे. मानवाला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी जनजागृती करावी लागेल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमुर्ती जी.जे. अकर्ते यांनी केले.
भंडारा वन विभागातर्फे वन, वन्यजीव अपराध आणि संबंधित कायदे या विषयावर भंडारा जिल्ह्यातील न्यायधिश, वन विभाग, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांची संयुक्त कार्यशाळा साकोली येथे घेण्यात आली. एम.बी. पटेल महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी मुख्य वन संरक्षक एस.जी. टेंभुर्णीकर यांनी भारतात विविध राज्यकर्त्यांच्या काळात वन संवर्धनाचे व संरक्षणाचे कायदे कसे होते आणि ते कसे बदलत गेले याबाबत माहिती दिली. वन ही उघडी संपत्ती आहे. यात घडलेले गुन्हे अशा ठिकाणी जिथे काही साक्षीदार नसतो. असे गुन्हे घडल्यावर त्यासाठी कागदपत्रे, पुरावे गोळा करणे जिकरीचे असते.त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून वन गुन्हे न्यायालयात योग्य प्रकारे कसे सादर करावेत हे समजवून घ्यावे.
कार्यशाळेला आमदार बाळा काशिवार यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. कार्यशाळेत अॅड. भारती डोंगरे यांनी वन गुन्हयासंबंधात न्यायालयात प्रकरण सादर करतांना कोणत्या त्रृटी असतात आणि त्या कशा प्रकारे टाळता येतील याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. कार्तिक सुकूल यांनी गुन्हेगारांना जामिन मिळाल्यास तो रद्द करण्यासाठी कायदयात कोणत्या तरतूदी आहेत याविषयी माहिती दिली. मुख्य वन संरक्षक कार्यालयातील विधी सल्लागार अॅड. कविता भोंडगे यांनी प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करतांना त्रृटी कशा प्रकारे टाळाव्यात या विषयी माहिती विषद केली. त्याच बरोबर दिल्लीस्थित वन्य जीव संरक्षण संस्था यांचे प्रतिनिधी नितीन देसाई यांनी चित्रफितीद्वारे वनगुन्हे, वाघांचे शिकार व त्यांच्या अवयवांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली यांबाबत माहिती दिली. प्रास्ताविक गोंदिया वनजीव विभागाचे वन संरक्षक संजय ठवरे यांनी केले.
( प्रतिनिधी)