तालुका अधिकाऱ्यांकडून लसीकरणासाठी गावागावांत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:15+5:302021-04-30T04:44:15+5:30
लाखांदूर : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात ...
लाखांदूर : कोविड चाचणीदरम्यान तालुक्यात नियमित मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना नागरिकांकडून कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सदर परिस्थितीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करीत खुद्द तालुका अधिकाऱ्यांनी गावागावांत भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे.
शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत मागील काही महिन्यांपासून तालुक्यात ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. मात्र लसीकरणासंबंधाने विविध अफवांना बळी पडून हेतुपुरस्सर नागरिकांकडून लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिस्थितीत तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाअभावी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे.
दरम्यान, या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत तालुक्यातील सर्वच गावांत लसीकरणासाठी जनजागृती केली जात आहे. तथापि लाखांदूरचे तालुका आरोग्याधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम यांनी नागरिकांच्या लसीकरणासाठी खुद्द तालुक्यातील काही गावात जाऊन भोंगा वाजवून जनजागृती चालविली आहे.
दरम्यान, तालुक्यात गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिसून येणारी वाढ कमी करण्यासाठी तालुक्यातील ४५ वर्षे वयोगटावरील सर्वच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.