महावितरणच्या वीजतोड मोहिमेविरुद्ध जनतेत आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:53 AM2021-02-23T04:53:29+5:302021-02-23T04:53:29+5:30
कोरोना संकटात अपरिहार्य ठरलेल्या लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. परिणामी, शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत अशा ...
कोरोना संकटात अपरिहार्य ठरलेल्या लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. परिणामी, शासनाने जनतेला मोफत अन्नधान्य, कर्जाच्या हप्त्यांमध्ये सवलत अशा अनेक सुविधा दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील वीजबिल शासन माफ करेल, अशी जनतेची रास्त अपेक्षा होती. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी त्या कालावधीत तसे सूतोवाच करून जनतेच्या अपेक्षा वाढविल्या. मात्र, नुकत्याच सुरू झालेल्या वीजतोड मोहिमेमुळे जनतेची बिलमाफीची अपेक्षा धुळीस मिळाली.
अनेक वीज ग्राहकांकडे मार्च २०२० पासूनची बिले थकीत असून वीज कंपनी थकीत बिलांवर दर महिन्याला व्याज आकारत असल्याने बिलाची रक्कम आणखी फुगली आहे. शेतकऱ्यांच्या धानाची मोजणी झाली असली तरी त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाहीत तर काही शेतकऱ्यांचे धान अद्यापही मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. अशा वेळी एवढे मोठे बिल कसे भरावे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तर हातावर पोट असणाऱ्या गरीब शेतमजुरांची अवस्था याहूनही बिकट आहे. दरम्यान, शासनाने लॉकडाऊन काळातील ३-४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे आणि वीज खंडितची ही धडक मोहीम तातडीने बंद करावी, अशी जनतेची मागणी आहे.
बॉक्स
३२ लाख रुपये थकीत
प्राप्त माहितीनुसार, विरली (बु.) वितरण केंद्रांतर्गत ६७७ वीज ग्राहकांकडे एकूण ३२ लाख ३८ हजार रुपयांची वीजबिले थकीत होती. यापैकी सुमारे शंभर ग्राहकांनी वीज खंडित करण्याची नोटीस मिळाल्यानंतर बिलाचा भरणा केला. त्यामुळे उर्वरित सुमारे सहाशे ग्राहकांवर वीज खंडितची कुऱ्हाड कोसळणार आहे.
बॉक्स
अन्यथा रॉकेलचा पुरवठा करा
सद्य:स्थितीत एवढे मोठे बिल भरणे शक्य नसल्यामुळे अनेक ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. परिणामी, अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने पूर्वीप्रमाणे स्वस्त दरात रॉकेल उपलब्ध करून जनतेचे जगणे सुसह्य करावे, अशी जनतेची मागणी आहे.