सार्वजनिक शौचालय अतिक्रमणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:55 PM2018-04-18T22:55:41+5:302018-04-18T22:55:41+5:30
तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकºयांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील चुल्हाड या गावात आठ हजाराहून जास्त लोकवस्ती आहे. माजी सरपंच रेखा सोनवाने यांच्या कार्यकाळात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असता अधिक लोकवस्तीच्या सिहोरा, बपेरा व चुल्हाड अशा तीन गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.
सिहोरा गावात या सार्वजनिक शौचालयाचे कुलूप आजपर्यंत उघडण्यात आले नाही. बपेरा गावात असलेले सार्वजनिक शौचालय केरकचऱ्यांनी तुंबलेले आहे. गावात नळयोजना असताना तिन्ही गावात सार्वजनिक शौचालयात पाणी आणि नळ उपलब्ध करण्याची तसदी ग्रामपंचायतने घेतली नाही.
चुल्हाड गावात देवरीदेव मार्गावर सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. सुरूवातीपासून या शौचालयाचे देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. या शौचालयाचा उपयोग काही गावकऱ्यांनी केला. परंतु काही दिवसापासून या शौचालयकडे कुणीही फिरकत नाही. शौचालयाचे मागील बाजूस खड्डा आहे. या गडरवरच गावातील काही नागरिकांनी घर बांधकाम करण्यासाठी अतिक्रमण केले आहे. समोर शौचालय आणि मागे नागरिकांचे वास्तव्य असल्याने, अतिक्रमणधारकांच्या समोरच शौच करण्याची नामुष्की गावकऱ्यांवर आली आहे.
सार्वजनिक शौचालय शेजारी अतिक्रमण करण्यात आल्याने शौचास जाणारे नागरिकांची अडचण होणार आहे. अतिक्रमणधारकाला जागा मोकळी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
-इंद्रपालसिंग सोलंकी, उपसरपंच चुल्हाड.