अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या
By admin | Published: March 18, 2017 12:25 AM2017-03-18T00:25:13+5:302017-03-18T00:25:13+5:30
अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, ...
माळी समाजाचा निषेध मोर्चा : तरूणीवरील सामूहिक अत्याचाराबद्दल संताप
भंडारा : अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, यासह विविध मागण्यांचा आक्रोश करीत शेकडो माळी समाजबांधव शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. लाखांदूर येथील पीडित मुलीला न्याय व तिच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय माळी महासंघाच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
लाखांदूर येथील १६ वर्षीय मुलीवर पाच तरूणांनी जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार करून चित्रफित तयार केली. त्यानंतर अत्याचार करणाऱ्या तरूणांनी अत्याचाराची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल केली. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. दरम्यान १५ दिवस ही चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल झालेली असताना व अनेक पोलिसांनी ती बघितली असतानाही पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावर पांघरूण घातले. त्यामुळे या प्रकरणात अत्याचार करणाऱ्या आरोपींसह प्रकरणावर पडदा पाडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करावे, असा आरोप माळी बांधवांनी केला आहे.
शिक्षणासोबतच मोलमजुरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची चित्रफित तयार करून ती अनेक मोबाईलवर प्रसारीत करणे हा सायबर गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसांनी यात तातडीने कारवाई करण्याऐवजी आरोपींना पाठबळ दिले. दरम्यान आरोपी व त्यांच्या कुटुंबियांनी पीडित मुलीला व तिच्या पालकांना पोलिसात तक्रार न देण्याची धमकी दिल्याने कुटुंबिय भयभीत झाले आहे. या प्रकरणाचा निषेध करण्याकरिता अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे, प्रदेश उपाध्यक्ष अॅड.राजेंद्र महाडोळे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी, तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी, माधुरी देशकर, प्रकाश अटाळकर, बंडू बनकर, रविकिरण भुसारी, विजय शहारे, कैलास जामगडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
हुतात्मा स्मारक येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चेकऱ्यांची आपल्या भाषणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर मोर्चेकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी व जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. मोर्चात अनिल डोंगरवार, भागवत किरणापुरे, रमेश गोटेफोडे, हेमंत नागरिकर, अनिल किरणापुरे, ललीत नागरिकर, राधेश्याम आमकर, नामदेव कांबळे, पवन तिजारे, प्रविन पेटकर, नानाजी आदे, अमोल गुरूनुले, रोहिनी पाटील, गायत्री इरले, प्रकाश लोखंडे, रवि शेंडे, राजोरा वाढई, माधुरी ऐनकर, सुनिता शाहकर यांच्यासह जिल्ह्यातील माळी समाजबांधव सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)