पूर्व विदर्भात ७५ लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 01:09 PM2020-02-29T13:09:52+5:302020-02-29T13:10:51+5:30
बाजारपेठेपेक्षा मिळणारे अधिक दर आणि उच्च प्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याने यंदा पूर्व विदर्भात धानाची विक्रमी खरेदी झाली आहे.
ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बाजारपेठेपेक्षा मिळणारे अधिक दर आणि उच्च प्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याने यंदा पूर्व विदर्भात धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. पणन महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाने फेब्रुवारी महिनाअखेर ७५ लाख क्विंटल धान खरेदी केले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विक्रमी ४५ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे.
पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हे धान उत्पादक म्हणून ओळखले जाते. सर्वसाधाण आणि उच्च प्रतिच्या धानाची लागवड शेतकरी करतात. अलिकडे उच्च प्रतिच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सर्वसाधारण धान लागवडीकडे आहे. ८० टक्के क्षेत्रात या धानाची लागवड होत आहे. सर्वसाधारण धानाचे आधाभूत दर १८१५ रुपये तर उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये प्रती क्विंटल दर आहेत. बोनस आणि दर वाढीने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये दर आधारभूत केंद्रावर मिळत आहे. उलट बाजारपेठेत धान केवळ १५०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी आपला धान आधारभूत खरेदी केंद्रावर विकत आहे. उच्च प्रतीचा धानही दरात फारसा फरक नसल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे यंदा धानाची प्रचंड आवक वाढली असून गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत.
पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आधारभूत धान खरेदी केला जातो. १ नोव्हेंबर २०१९ पासून धान खरेदीला प्रारंभ झाला असून पूर्व विदर्भात आतापर्यंत तब्बल ७५ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. आणखी महिनाभर ही खरेदी सुरू राहणार असल्याने हा आकडा १०० लाख क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पणन महामंडळाने ५१ लाख नऊ हजार ९९४ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक गोंदिया जिल्ह्यात २४ लाख ८१ हजार ४३५ क्विंटल आणि भंडारा जिल्ह्यात १९ लाख सहा हजार ५५६ क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर आदिवासी विकास मंडळाने २२ लाख १४ हजार ७०० क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात १० लाख ४४ क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख २७ हजार क्विंटल, गडचिरोली जिल्ह्यात सात लाख ८२ हजार क्विंटल आणि अहेरी येथे तीन लाख ९६ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे.