जिल्ह्यात ८ लाख क्विंटल धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:27+5:30
भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली असून २६ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाची किंमत १४६ कोटी ३० लाख १ हजार ६९५ रुपये असून ९० कोटी ३७ लाख ८९ हजार ७७ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही ५५ कोटी ९२ लाख १२ हजार ६१७ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. धान खरेदी केंद्रावरील असुविधांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
भंडारा जिल्हा धानउत्पादक जिल्हा आहे. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ७४ केंद्र मंजूर असून प्रत्यक्षात ७३ केंद्रांवर खरेदी करण्यात आली आहेत. १ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत ८ लाख ६ हजार ६१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २४ हजार ३३५ क्विंटल, मोहाडी तालुक्यात ८२ हजार ७०० क्विंटल, तुमसर तालुक्यात १ लाख ५७ हजार ८२२ क्विंटल, लाखनी तालुक्यात १ लाख ४१ हजार ४७२ क्विंटल, साकोली तालुक्यात १ लाख ६२ हजार ३०२ क्विंटल, लाखांंदूर तालुक्यात १ लाख ७९ हजार ७९ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ५८ हजार २९६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
या धानाची किंमत १४६ कोटी ३० लाख १ हजार ६९५ रुपये आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ९० कोटी ३७ लाख ८९ हजार ७७ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. मात्र ५५ कोटी ९२ लाख रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत.
जिल्ह्यातील २३ हजार ६०९ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे. मात्र अद्यापही संपूर्ण शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यातच बोनसमध्ये वाढ झाल्यानंतर धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. गोदामांचा अभाव आणि संथगतीमुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
उच्चप्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर
साधारण प्रतीच्या धानाला १८१५ रुपये आणि उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये आधारभूत किंमत आहे. ५०० रुपये बोनस आणि वाढीव २०० रुपये असे २५०० रुपये प्रतिक्विंटल रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांनी सर्वसाधारण म्हणजे जाड धान आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणला होता. मात्र बोनस घोषीत झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना उच्चप्रतीचा अर्थात बारीकधानही विक्रीसाठी आणला आहे. सर्वसाधारण धानाच्या किमतीत उच्चप्रतीच्या धानाची विक्री होत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक उच्च प्रतीचा धान व्यापाऱ्यांनी खरेदी केला असून हाच धान आता आधारभूत केंद्रावर येत आहे.