तीन दिवसात सुरू होणार रब्बी धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:04 PM2021-05-18T20:04:53+5:302021-05-18T20:05:20+5:30
Bhandara news रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धान खरेदी येत्या तीन दिवसात सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
रब्बी हंगामातील धान खरेदीचा तिढा सोडून त्वरित धान खरेदीला सुरुवात व्हावी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात या विषयावर अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक पार पडली. बैठकीला खासदार प्रफुल्ल पटेल, आदिवासी विकास व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत रब्बी हंगामातील धान खरेदी त्वरित सुरू करण्यात बाबत चर्चा करण्यात आली.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खरीप हंगाम तोंडावरून असून, अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणीदेखील पूर्ण होत आली आहे. अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांना खरिपासाठी बियाणे, खते आणि मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे. मात्र या दोन्ही विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाने त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सांगितले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा त्वरित धान खरेदी सुरू करण्याचे निर्देश दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यावर अधिकाऱ्यांनी तीन दिवसात केंद्र सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत खासदार पटेल यांना दिले.