उन्हाळी धान खरेदीचे चुकारे अडले
By admin | Published: July 2, 2015 12:43 AM2015-07-02T00:43:34+5:302015-07-02T00:43:34+5:30
शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली.
शेतकरी आर्थिक संकटात : ३.७१ कोटीची थकबाकी
अशोक पारधी पवनी
शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची खरेदी करण्यात आली. परंतु महिना लोटल्यानंतरही उन्हाळी धान खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे खरीप पिकाचे पेरणीसाठी लागणारा खर्च कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पवनी तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून शेतकी खरेदी विक्री सहकारी संघाचे वतीने चार केंद्रावर ७०५ शेतकऱ्यांकडून २७३१४.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धानाची खरेदी रक्कम ३ कोटी ७१ लक्ष ४७ हजार ८५६ शासनाकडून देण्यात आलेली नाही. खरेदी विक्री संस्थेने त्यांच्या लिमीटमधून आतापर्यंत १ कोटी १० लक्ष रु. शेतकऱ्यांना अॅडव्हान्स पेमेंट केलेला आहे. उर्वरीत रक्कम न मिळाल्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील पवनी केंद्रावर ७९६९.२० क्विंटल, आसगाव केंद्रावर ९२२९.९० क्विंटल, कोंढा केंद्रावर ६९८१ क्विंटल तर अड्याळ केंद्रावर ३१३४.६० क्विंटल असे एकूण २७३१४.६० क्विंटल धान खरेदी करण्यात आले. खरीप हंगामासाठी खर्च करता यावे यासाठी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना न विकता आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकलेले आहे. परंतु शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या शासनाने शेतकऱ्यांनाच अडचणीत आणले आहे. त्यामुळे हेच का अच्छे दिन असा प्रश्न जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना ग्रामीण भागात विचारला जात आहे.
बोनसचा देखील पत्ता नाही
खरीप हंगामाचे धान आधारभूत केंद्रावर देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने बोनस देण्याची घोषणा केली. परंतु बोनसची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. धानाचे चुकारे व बोनस केव्हा मिळणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.
पावसाची हजेरी
पालांदूर : सात दिवसाच्या विश्रांतीनंतर पालांदूर परिसरात पावसाने हजेरी लावली. पऱ्ह्यांना संजीवनी मिळाली असून रोवणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदानानंतर रोवणीला गती येणार आहे. दुबारपेरणी संकट टळल्याने शेतकरी सुखावला आहे. सिंचनाखाली क्षेत्रात रोवणीस आरंभ झाला आहे.