कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:41 PM2018-04-20T22:41:06+5:302018-04-20T22:42:10+5:30
जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. जेसीपी उपलब्ध करुन घ्यावे. त्यासाठी लागणारे इंधनाची सोय करण्यात येईल, असे ते म्हणाले.
जलयुक्त शिवार, गाळमुक्त तलाव व पाणी टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, उप कार्यकारी अधिकरी मंजूषा ठवकर, कार्यकारी अभियंता मैदमवार, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, तहसिलदार अर्चना मोरे यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी यांनी जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गाळयुक्त शिवार व गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. त्यासाठी लागणारे जेसीपी उपलब्ध करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यंत्रणांना दिल्या. तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी व खंड विकास अधिकारी यांनी संयुक्तीक काम करुन कामास गती दयावी. तहसिलदारांनी वेळोवेळी या कामांचा आढावा घ्यावा. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर भर दयावा. यासाठी सरपंच व जिल्हा परिषद सदस्याचे सहकार्य घ्यावे.
प्रत्येक उपविभागात एका तालुक्यात तीन कामे घ्यावीत, त्याचा आढावा उपविभागीय अधिकाºयांनी घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. कंत्राटदार काम करण्यास तयार नसतील तर सोसायटयामार्फत तसेच बेरोजगारांमार्फत काम करवून घ्या व कामाची गती वाढवा.
अकार्यक्ष्म कंत्राटदाराकडून कामे प्रलंबित राहीली तर त्यांना काळया यादीत टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के कामे पूर्ण करा. यंत्रणांमध्ये समन्वय कमी आहे, तो वाढवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. पाणी टंचाईबाबत नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच खिंडसी प्रकल्पातून सूर नदीत ३०० क्युबिक पाणी सोडण्यात येत असून १.२ क्युबिक पाणी सोडले जात आहे. तसेच इटियाडोह धरणातून लाखांदूर तालुक्यात पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.