आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 07:45 AM2022-04-17T07:45:00+5:302022-04-17T07:45:01+5:30

Bhandara News सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली.

Putting a military cap on her mother's head, she bowed down | आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

आईच्या डोक्यावर सैनिकी कॅप ठेवून 'ती' झाली नतमस्तक

Next
ठळक मुद्दे कुशारीची अर्चना सशस्त्र सीमा बलातगावात जल्लोष

राजू बांते

भंडारा : सशस्त्र सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आलेल्या अर्चना गायधने या कर्तृत्ववान मुलीचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. तिचे औक्षण करताना आईचे डोळे पाणावले. यावेळी अर्चनाने आपली सैनिकी कॅप आईच्या डोक्यात घातली आणि पायावर नतमस्तक झाली. क्षणाचे साक्षीदार असणारे गावकरी भारावून गेले होते. ही कर्तृत्ववान तरुणी माेहाडी तालुक्यातील कुशारी येथील शालिकराम गायधने यांची लेक आहे.

बिहार राज्यातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रथमच गावी आली. स्वागतासाठी संपूर्ण गाव वेशीवर जमा झाले होते. अर्चनाने गावच्या वेशीवर पाय ठेवताच ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. आई शीलाने आपल्या लेकीचे औक्षण केले. त्या क्षणी मुलीने आपली सैनिकी कॅप (टोपी) आईच्या शिरपेचात घातली. त्या क्षणी निशब्द झालेल्या जनसमुदायाची अभिमानाने मान उंचावली. तब्बल दोन तास गावात भ्रमंती करून गौरव क्षणाच्या आनंदाला उधाण आला होता. अर्चना गायधने हिने पहिल्या प्रयत्नात सशस्त्र सीमा बलात भरतीमध्ये यशाला गवसणी घातली.

आई आजही दुसऱ्याच्या शेतीवर मजूर म्हणून कामाला जाते. सन २०१३ मध्ये अर्चनाच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईला धीर देत मी एक दिवस आपल्या देशाची सैनिकी वर्दी घालूनच गावात येणार, असे सांगून दिलेले वचन तिने पूर्ण केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. जगदीश दिपटे, प्रकाश महालगावे, वासनिक, गिरेपुंजे या शिक्षकांनी संस्कार दिले. शिक्षणात खंड पडू न देता ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी अतिरिक्त वेळ खर्ची घालायची.

जिद्दी प्रयत्नांना यश

देशसेवेची इच्छा मनात असल्याने ती शालेय जीवनापासून नियमित सराव करायची. दररोज सकाळी उठणे व धावायला जाणे त्यानंतर कॉलेज व पुन्हा व्यायाम असा तिचा नित्यक्रम असायचा. तिच्या जिद्दी प्रयत्नांनी यश मिळाले. अर्चनाच्या जिद्दीला आईने नेहमी बळ दिले. यामुळे तिला सहज यश गाठता आले. तिच्या प्रेरणेने गावातील युवक युवतींना स्फूर्ती मिळाली. यावेळी कुशारी ग्रामपंचायतचे सदस्य लोकेश गायधने, आदर्श बडवाईक, तेजस मोहतुरे, पत्रकार यशवंत थोटे आदींनी तिचे कौतुक केले.

पालकांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा. तिला पुढे जाण्याची प्रेरणा दिली पाहिजे. मुलींनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. मुली अबला नको रणांगणी बनावे.

- अर्चना गायधने

Web Title: Putting a military cap on her mother's head, she bowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.