जलयुक्त शिवाराच्या कामांचा दर्जा उत्तम असावा
By admin | Published: March 31, 2016 01:01 AM2016-03-31T01:01:13+5:302016-03-31T01:01:13+5:30
जलयुक्त शिवार अभियानामध्ये करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा उच्च असला पाहिजे. ज्या विभागांनी २०१६-१७ च्या नियोजनात कामे घेतली नाहीत, ...
भंडारा : जलयुक्त शिवार अभियानामध्ये करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा उच्च असला पाहिजे. ज्या विभागांनी २०१६-१७ च्या नियोजनात कामे घेतली नाहीत, त्यांनी ५९ गावांमध्ये कामाचे नियोजन करावे. तसेच या ५९ गावांमध्ये तात्काळ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिल्यात.
जलयुक्त शिवार २०१६-१७ चे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. ५ तास चाललेल्या याबैठकीला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, उपवन संरक्षक एन. आर. प्रविण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनिल पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिलीप तलमले, शिल्पा सोनुले उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ या वषार्साठी निवड करण्यात आलेली गावे अशी आहेत. भंडारा तालुका- चोवा, रावणवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार/डोड, कोका, सपेर्वाडा, दुधाळा, राजेदहेगाव (एकूण १०). मोहाडी तालुका- महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव/धु, धोप, ताडगाव, जांब (एकूण १० ). तुमसर तालुका- सौदेपूर, राजापूर, येदरबुची, झारली, सोनेगाव, हिंगणा, मिटेवाणी, सुकळी, देव्हाडी, लोभी (एकूण १०). पवनी तालुका- तांबेखानी, रेंगेपार, ब्रम्ही, निलज, भुयार, आमगाव, कातुर्ली, धानोरी, शेलारी (एकूण ९). लाखनी तालुका- निमगाव, मांगली, देवरी, रेंगोडा, किटाळी, मुरमाडी/हमेशा, मुरमाडी/तुप, पहाडी, घोडेझरी (एकूण ९). साकोली तालुका- पळसपाणी, सावरगाव रिठी, सालई खुर्द, सराटी, आमगाव बु., विरसी (एकूण ६ ). लाखांदूर तालुका- झरी, पार्डी, तिरखुरी, दिघोरी मोठी, पेंढरी/सोनेगाव (एकूण ५ ) अशा एकूण ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. या ५९ गावांमध्ये एकूण १ हजार २५९ कामे प्रस्तावित असून ४६ कोटी २७ लक्ष रुपयांचा निधी यासाठी लागणार आहे.
जलयुक्त शिवार मध्ये कृषि विभागाचे ७७४ कामे (निधी १३९३.३), ग्रामपंचायत १३६ कामे (५६६.५९), जि.प. लघुपाटबंधारे १५९ कामे (१६७९), वन विभाग १०३ कामे (४२३.९०), सामाजिक वनीकरण ४ कामे (२४.३६), लघुसिंचन जलसंपदा २० कामे (१६४.३६), वरिष्ठ भुवैज्ञानिक ४५ कामे (२०.२५), लघुसिंचन, जलसंधारण १७ कामे (३५२.२८), पेंच व्यवस्थापन १ काम (२.९) इत्यादी कामांचा समावेश आहे. २०१६-१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये शेततळे, नाला खोलीकरण, सिमेंट नालाबांध, मजगी, भातखाचरे दुरुस्ती, मामा तलाव खोलीकरण, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, वनतळे इत्यादी कामांचा समावेश राहणार आहे.
गावांचे नियोजन करतांना गावाची एकूण पाण्याची गरज लक्षात घेवून कामांचे नियोजन करावे. यामध्ये गावाला पिण्यासाठी लागणारे पाणी, तीनही हंगामातील पिकांसाठी लागणारे पाणी आणि जनावरे व इतर बाबींसाठी लागणारे पाणी याचा विचार करुन नियोजन करावे. गावात एकूण पडणारे पावसाचे पाणी आणि जलयुक्त शिवार मधून करण्यात येणाऱ्या कामांमुळे अडणारे पाणी याचा ताळमेळ बसायला पाहिजे. सर्व पाणी गावातच अडविल्या आणि साठविल्या जाईल याची खबरदारी घ्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामाची टक्केवारी अतिशय कमी असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांच्या अमंलबजावणी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अपूर्ण असलेली सर्व कामे जून २०१६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, अशी सक्त ताकिद जिल्हाधिकारी यांनी दिली.या बैठकीला उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)