Corona Virus in Bhandara; मरकजवरून आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:44 PM2020-04-01T17:44:28+5:302020-04-01T17:44:48+5:30
दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोघांना यापूर्वीच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी प्राप्त माहितीनुसार त्या दोघांनाही येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून आले नाहीत. त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान लाखनी तालुक्यातील २० जण हरिद्वार येथे यात्रेला गेले होते. ते निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून आपल्या गावी २२ मार्चला परत आले. त्यापैकी सहा जणांना सर्दी असल्याने बुधवारी येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे परतीच्या प्रवासात त्यांची भंडारा रोड रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर तेही होम क्वारंटाईन होते. मात्र बुधवारी त्यांना भंडारा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले.