गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संसदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 09:45 PM2018-08-04T21:45:55+5:302018-08-04T21:46:37+5:30
जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
पवनी तालुक्यातील गोसेखुर्द अर्थात इंदिरा सागर प्रकल्प आहे. १९८६ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. परंतु आजही या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या कायम आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर या परिसरातील २२ गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला होता. एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आता त्यांचा हा प्रश्न खासदार मधुकर कुकडे यांनी लोकसभेत उपस्थित केला. नियम १९९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.
गोसेखुर्द प्रकल्पातील बाधितांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सिंचन पॅकेजचाही लाभ मिळाला नाही. घराचे पट्टेही अनेकांना मिळाले नाही. त्यामुळेच या परिसरातील २२ गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगत असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे लोकसभेत सांगितले. अनेक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या मुलासमोर रोजगाराचा प्रश्न आहे. अनेक प्रकल्पग्रस्त आज उपेक्षिताचे जिने जगत आहे. आपल्या भविष्याची शिदोरी या प्रकल्पाने हिरावून घेतली. शासनाने सरुवातीला त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु या आश्वासनाची पुर्तता पुर्नवसनात झाली नाही. अनेक समस्या आजही कायम आहेत. आजपर्यंत हा प्रश्न संसदेत कुणीही उपस्थित केला नव्हता. परंतु पोटनिवडणुकीनंतर खासदार झालेले मधुकर कुकडे यांनी या प्रश्नाला वाचा फोउली. या सर्वांच्या समस्या सोडविल्या तर भविष्यात ते निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाहीत. असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.
बावनथडीचे पाणी शेतकऱ्यांना द्या
तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील १२ गावातील शेतकºयांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या मुद्यावरही खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेचे लक्ष वेधले. बावनथडी परिसर आदिवासी बहुल आहे. पाण्याअभावी शेती पिकेनाशी झाली आहे. या सर्व प्रकरणी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडण्याची गरज आहे. यातून विजेची बचत होईल आणि गावातील शेतकºयांनाही पाणी मिळेल असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.