राष्ट्रीय महामार्गाच्या मुरूम भराव कामावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:45 PM2019-01-22T22:45:32+5:302019-01-22T22:45:49+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यातील शिवारात राष्ट्रीय महामार्गात मुरूमाच्या भरावाकरिता महसूल प्रशासनाने पुन्हा जांब कांद्री येथील गटक्रमांक ६६९/१ येथून लीज मंजूर करण्यात आली. सदर गटात भूगर्भातून पाणी लागेपर्यंत मुरूमाचे उत्खनन करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम भरावयाचे काम सध्या बंद असल्याची माहिती आहे. सदर कंपनीचे अधिकारी महसूल प्रशासनाचे उंबरडे झिजवत आहेत, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील शिवारात राष्ट्रीय महामार्गात मुरूमाच्या भरावाकरिता महसूल प्रशासनाने पुन्हा जांब कांद्री येथील गटक्रमांक ६६९/१ येथून लीज मंजूर करण्यात आली. सदर गटात भूगर्भातून पाणी लागेपर्यंत मुरूमाचे उत्खनन करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम भरावयाचे काम सध्या बंद असल्याची माहिती आहे. सदर कंपनीचे अधिकारी महसूल प्रशासनाचे उंबरडे झिजवत आहेत, हे विशेष.
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे सध्या कामे जोमात सुरू करण्यात आले, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम भरावात मुरूमाचे अवैध उत्खनन करून घालण्यात आले. केवळ अडीच हजार ब्रासची लीज महसूल प्रशासनाने दिली होती. प्रत्यक्षात २१ हजार ८०८ ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आले. महसूल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीत चार कोटी ४८ लक्ष १६ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस पाठविली.
जांब-कांद्री शिवारात पुन्हा गट क्रमांक ६६९/१ मध्ये महसूल प्रशासनाने मुरूम उत्खननाची लीजला मंजुरी प्रदान केली. येथेही नियमबाह्यपणे मुरूम उत्खनन करण्यात आले. जमिनीचा तळ लागून पाणी लागतपर्यंत मुरूम उत्खनन करण्यात आले. या प्रकाराची दखल पुन्हा महसूल प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या मुरूम भरावाची कामे बंद असल्याची माहिती आहे. कंपनीचे अधिकारी लीज मंजुरीकरिता महसूल कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याची माहिती आहे.
कोट्यवधींची कामे सध्या तुमसर-मोहाडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहेत. हजारो ब्रास मुरूम येथे भरावाकरिता लागत आहे. उपलब्ध मुरूम कमी असून लीज देण्याकरिता ब्रासची मर्यादा आहे. त्यामुळे जमिनीचा तळ लागेपर्यंत अंदाजे मुरूम उत्खनन सुरू आहे. पर्यारणाला येथे धोका निर्माण झाला आहे.
विकस कामांमुळे पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होतानी दिसत आहे. महसूल विभागाच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे येथे कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकारी तथा पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर प्रकरणी काय कारवाई होते, याकडे तुमसर व मोहाडी तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.