मोहफूल संकलन करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 05:00 AM2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:40+5:30
मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगलात न जाण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय देऊन मोहफूल संकलनाचे काम करु द्यावे अशी संकल्पना पुढे येऊ लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : तालुक्यातील पवनी व अड्याळ वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोहफूलाची वृक्ष आहेत. मोहफूल संकलनासाठी गाव- खेड्यातील महिला पहाटेपासून जंगलाकडे धाव घेतात. मात्र आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्याने मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोहफूलाची विक्रीतून शेकडो कुटुंबाची आर्थिक गरज भागते. त्यामुळे धोका पत्करून महिला मोहफूल संकलनासाठी जंगलात जात आहेत. सावरला परिसरातील जंगलात मोहफूल संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन तीला ठार केले होते. वनविभागाने जनजागृती करुन पहाटे जंगलात न जाण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमुळे गरीब कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सुरक्षित पर्याय देऊन मोहफूल संकलनाचे काम करु द्यावे अशी संकल्पना पुढे येऊ लागली आहे.
मोहफूल संकलन सोयीचे व्हावे म्हणून नागरिक जंगलात मोहफूल वृक्षाखाली आग लावून पालापाचोळा जाळतात त्यामुळे जंगलात आग लागून वनसंपदा नष्ट होत असते. तसेच मोहफूल संकलनासाठी पहाटे जंगलात गेल्यास जीवाला धोका संभवतो. हे टाळण्यासाठी वनविभागाने उन्हाचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणारी हिरवी जाळी मोहफूलाची संकलन करणाºया महिलांना पुरविल्यास झाडाखाली विशिष्ट उंचीवर जाळी बांधून खाली जमिनीवर न वाकता सहजपणे मोहफूल संकलन करणे सोयीचे होईल.
असे केल्यास पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावणे, पहाटे जंगलात जाऊन धोका पत्करणे व प्रसंगी जीव गमावून बसणे टळू शकते. वरिष्ठ अधिकारी सुरक्षित पर्याय देण्यासाठी विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.