कर्णकर्कश हॉर्न लावणारे वाहतूक पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:42+5:30
मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
देवानंद नंदेश्वर
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरासह जिल्ह्यात धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. हे टोळके कर्णकर्कश हॉर्न वाजवून वर्दळीच्या रस्त्यावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात. यातून ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. काहींना वाहन चालविताना सतत हॉर्न वाजविण्याची सवय जडलेली असते. त्यामुळेही इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा वाहनधारकांकडून वाहतूक पोलिसांनी २८ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. फटाके फोडणाऱ्या दुचाकींवर मात्र कारवाई झालेली नाही.
मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शाळा, महाविद्यालय परिसरात आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे महाविद्यालय परिसर सायलेन्स झोन असूनही तेथे नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. यावर कारवाईची प्रतीक्षा आहे. पाेलीसही आता सज्ज झाले आहे.
फटाके फोडणारे दुचाकीस्वार मोकाटच
काही विशिष्ट प्रकारच्या दुचाकींवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावले जाते. यातून ठिणग्याही बाहेर पडतात. अशा दुचाकी अगदी दाटीवाटीने व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात फिरवून दुचाकीस्वारांकडून फटाके फोडले जातात. अचानक जवळ येऊन प्रचंड आवाज आल्यानेही वाहनचालक घाबरून अपघात होण्याची भीती आहे. अनेक जण या फटाक्यांचा आवाज ऐकून कोसळले आहेत. मात्र, फटाके फोडणारे दुचाकीस्वार पोलीस कारवाईपासून दूर आहेत. अनेक तरुणांमध्ये माेटारसायकल वेगाने चालविण्याची क्रेझ अलीकडे पहावयास मिळत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंगणीक वाढ हाेत आहे.
वर्षभरात १४१ जणांवर पोलिसांचा दंडुका
वाहतूक पोलिसांनी भंडारा शहरासह जिल्ह्यात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १४१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २८ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला. काही ठिकाणी पोलिसांनी असे हॉर्न काढून घेतले. पोलीस कारवाई झाल्याने काही काळ अशा वाहनचालकांकडून हॉर्नचा वापर केला जात नाही. मात्र नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यातील दंडाची रक्कम वाढविण्याची गरज आहे.