राहुल गांधी देशाला तारणारे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:24+5:302021-06-23T04:23:24+5:30
दिनपवनी : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. केंद्र सरकारची मालमत्ता असलेली रेल्वे, विमानसेवा व विविध ...
दिनपवनी : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. केंद्र सरकारची मालमत्ता असलेली रेल्वे, विमानसेवा व विविध कंपन्या विकायचा सपाटा सुरू केला आहे. सर्व क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला चालना देऊन पुन्हा एकदा देशाला पारतंत्र्यात ढकलण्याचे षड्यंत्र सुरू आहे. जीएसटी, कोरोना संकट, लसीकरण या सर्वबाबतीत मोदी सरकार अपयशी ठरत आहे. अशावेळी ज्यांनी देशावर येऊ घातलेल्या कोरोना संकटाची पूर्वसूचना दिली, लसीकरण करून लोकांचे जीवन वाचविण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी देशाला तारणारे सक्षम नेतृत्व आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले.
गांधी चौक, पवनी येथे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी मोदी सरकारच्या तुघलकी कारभारावर टीका करताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे युवक मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाले. नोकरी, व्यवसायाची संधी त्यांना गमवावी लागली. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे शेतकरी व सामान्य जनता होरपळून निघत आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान स्वत:चे कौतुक करीत फिरत आहेत, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, खरेदी-विक्री संस्था, पवनीचे अध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, माजी न. प. उपाध्यक्ष धर्मेंद्र नंदरधने, माजी जि. प. सभापती हंसा खोब्रागडे, माजी सभापती नीलकंठ टेकाम, जिल्हा काँग्रेसचे सहसचिव अशोक पारधी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर उरकूडकर, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वा. च. रायपूरकर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे उपस्थित होते. उपस्थित महिला पदाधिकारी यांनी चुलीवर भाकरी भाजून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला. कार्यक्रमासाठी तालुका व शहर काँग्रेस, तालुका व शहर युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय. तालुका अनुसूचित जाती काँग्रेस सेल, सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिकेत गभने, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमित पारधी, एन.एस.यु.आय.चे तालुका अध्यक्ष महेश नान्हे व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.