ट्रॅकवरील पूल बांधकामाला रेल्वेची हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:30 AM2017-08-30T00:30:04+5:302017-08-30T00:30:33+5:30
तुमसर रोड येथील रेल्वे ट्रॅकवरील मुख्य उड्डाणपुल बांधकामाला हिरवी झेंडी मिळालेली असून या बांधकामाची निविदाही मंजूर झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर रोड येथील रेल्वे ट्रॅकवरील मुख्य उड्डाणपुल बांधकामाला हिरवी झेंडी मिळालेली असून या बांधकामाची निविदाही मंजूर झाली आहे. यासाठी रेल्वे परिसरातील जमिनीचा मोबदला संबंधित कंत्राटदाराने रेल्वेला दिला आहे. रेल्वे प्रशासनाच्या अभियंत्यांनी कंत्राटदारासोबत अलिकडेच पाहणी केली असून मुख्य सिमेंट रेल्वे पुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.
तुमसर रोड येथे रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर राज्य शासन तथा रेल्वे यांचा संयुक्त उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती. राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी कार्यारंभ केला आहे. तुमसर - गोंदिया अॅप्रोच रस्त्यासह दोन अंडरपास राज्य शासनाने तयार करावयाचे आहेत. एका अंडरपासचे काम पूर्ण झाले असून अॅप्रोच रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहे. राज्य शासन येथे ३२ कोटी रुपये खर्च करीत आहे.
रेल्वेने मुख्य सिमेंट पुलाचे (ट्रॅकवरील) काम करावयाचे आहे. १३ कोटींचे हे काम आहे. ६० मिटर लांब असा हा रेल्वे ट्रॅकवरील पुलाचे काम आहे. रेल्वेने निविदा काढली होती. संबंधित कंत्राटदाराला रेल्वेने हिरवी झेंडी दिली. रेल्वेचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते तथा कंत्राटदारांनी अलिकडेच पाहणी करून या कामांना सुरुवात केली आहे. जमिनीचा मोबदला कंत्राटदाराने येथे दिला.
६० मीटरचा स्पॅन येथे आहे. दोन्ही बाजूला नेहमी पाणी साचून राहत असल्याने रेल्वेची जमिनीची कसून तपासणी केली. पाणी निचरा कुठून होईल, याची सविस्तर माहिती स्थापत्य अभियंत्यांनी घेतली आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग येथे मोकळा झाला आहे.
सध्या राज्य शासनाच्या अखत्यारीतील अॅप्रोच रस्ता भरावयाची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरु करण्यात आलेला आहे. बाजुच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीची वर्दळ असल्याने कामे करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. परंतु खड्डे बुजविण्याची येथे गरज आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून जाणाºया वाहनांचे अपघात घडलेले आहेत.
जागतिक बँकेकडून या प्रकल्पाला निधी प्राप्त झाला असून बांधकाम खाते याठिकाणी पुलाच्या बांधकामावर नियंत्रण ठेवत आहेत. तुमसर-गोंदिया-रामटेक या मार्गावर उड्डाणपुल बांधकामाची मागील २५ वर्षापासूनची जुनी मागणी होती. उड्डाणपुल बांधकामाला पुन्हा येथे एक ते सव्वा वर्षे ईतका कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामे लवकरात लवकर व्हावी, यासाठी रेल्वे परिसरात साहित्याची जुळवाजुळव सुरु झाली आहे.