पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 04:47 PM2022-06-28T16:47:13+5:302022-06-28T16:48:57+5:30

पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील प्रकल्प आता तळाला गेले आहेत.

Rain disappears; Only 15.57 per cent water storage in 63 projects, condition of Mama lakes is deplorable | पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय

पाऊस बेपत्ता; ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा, मामा तलावांची स्थिती दयनीय

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात केवळ ९५ मिमी पावसाची नोंद, दमदार पावसाची प्रतीक्षा

भंडारा : जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस कोसळला नसून शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पेरणीसह रोवणीची कामे खोळंबली असून आता दमदार पावसाअभावी मध्यम आणि लघु प्रकल्पही तळाला गेले आहेत. जिल्ह्यातील ६३ प्रकल्पात केवळ १५.५७ टक्के जलसाठा असून ९ लघु व मामा तलावात ठणठणाट आहे.

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. मात्र अद्यापही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. १ जून ते २७ जून या कालावधीत केवळ ९५ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत २५८.७ मिमी पाऊस कोसळला होता. पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील प्रकल्प आता तळाला गेले आहेत.

जिल्ह्यात मध्यम, लघु प्रकल्प आणि मामा तलाव असे ६३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १२१.७६ दलघमी आहे. मात्र सद्यस्थितीत या प्रकल्पात केवळ १८.९६ दलघमी जलसाठा असून तो १५.५७ टक्के आहे. जिल्ह्यातील ४ मध्यम प्रकल्पांची क्षमता ४२.८१ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ३.८४ दलघमी म्हणजे ८.९८ टक्के जलसाठा आहे. त्यात चांदपूर प्रकल्पात केवळ ०.३२ टक्के, बघेडा २६.४३ टक्के, बेटेकर बोथली ३७.९१ टक्के, सोरणा २०.२४ टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पाची साठवण क्षमता ५३.५४ दलघमी असून सध्या या प्रकल्पात ११.०८ दलघमी जलसाठा आहे. २०.६९ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील २८ मामा तलावांची साठवण क्षमता २५.४० दलघमी असून सध्या या तलावांमध्ये ४.०३ दलघमी म्हणजे १५.८७ टक्के जलसाठा आहे.

दररोज ढगाळ वातावरण तयार होते. परंतु काही भागात पाऊस बरसून पुन्हा उन्हं सावलीचा खेळ सुरू होतो. अद्याप जिल्ह्यात सर्वदुर कुठेही जोरदार पाऊस झाला नाही. प्रकल्प तळाला गेले असून आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

४ लघु, ५ मामा तलाव कोरडे

भंडारा जिल्ह्यातील ४ लघु प्रकल्प आणि ५ मामा तलाव कोरडे पडले आहेत. लघु प्रकल्पात साकोली तालुक्यातील कुंभली, लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा आणि खुर्शीपार या प्रकल्पात ठणठणाट आहे. तर साकोली तालुक्यातील सानगडी, केसलवाडा, रेंगेपार कोहळी आणि लाखनी तालुक्यातील कनेरी, चान्ना या पाच मामा तलावात सध्या पाण्याचा एकही थेंब नाही.

Web Title: Rain disappears; Only 15.57 per cent water storage in 63 projects, condition of Mama lakes is deplorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.