जिल्ह्यात पावसाचे थैमान, घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:43+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. पवनी, लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पवनी तालुक्यातील ढोरप, कन्हाळगाव, शिरसाळ, झरप, सावरला यासह अनेक नदी, नाल्याच्या तीरावरील गावांमध्ये पुराचे पाणी घरामध्ये शिरले. ढोरप येथील नाल्याच्या पुराचे पाणी १३ घरामध्ये शिरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थैमान घातले असून मुसळधार बरसलेल्या पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील शेकडो घरांची पडझड झाली असून नाल्याच्या तिरावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. ढोरप येथील १३ कुटुंबांतील ४० जणांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले. जिल्ह्यातील चार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वैनगंगा नदी सायंकाळी ६ वाजता ९.४२ मीटर या धोक्याच्या पातळीपर्यंत वाहत होती. पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. पवनी, लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. पवनी तालुक्यातील ढोरप, कन्हाळगाव, शिरसाळ, झरप, सावरला यासह अनेक नदी, नाल्याच्या तीरावरील गावांमध्ये पुराचे पाणी घरामध्ये शिरले. ढोरप येथील नाल्याच्या पुराचे पाणी १३ घरामध्ये शिरले. आपत्ती व्यवस्थापनाच्या बचाव पथकाने धाव घेत ४० जणांना सुरक्षित बाहेर काढले. नदी-नाल्याला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील चार मार्ग बंद पडले होते. त्यात लाखांदूर ते वडसा तर पवनी तालुक्यातील ढोरप, भंडारा तालुक्यातील चांदोरी आणि भुयार ते नागभीड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुरामुळे व अतिवृष्टीने अनेक घरांची पडझड झाली आहे.
भंडारा शहरात सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले होते. तब्बल दोन तास पाऊस बरसला. या पावसाने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शहरातील काही रस्ते जलमय झाले होते. भंडारा तालुक्यातील सावरी, कवळशी, खराडी येथे अतिवृष्टीने घरांची पडझड झाली. खराडी येथील मारोतराव हिवसे यांच्या घरात अर्धा फूट पाणी जमा झाले होते. संगिता लेखन हिवसे, बेबीबाई चैतराम गाडबैल, विनायक दयाराम हिवसे, चोखाराम किसन हिवसे यांच्या घरांच्या भिंतींची पडझड झाली. जवाहरनगर परिसरातील सावरी-जवाहरनगर येथील दोन घरे संततधार पावसाने कोसळली. सुनील सुखदेव रामटेके व सुनिता चव्हाण यांचे विटा-मातीचे घर कोसळले. जवाहरनगर परिसरात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही. लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात झालेल्या अतिवृष्टीने नदी, नाल्यांना पूर आला आहे. शेतशिवारात पुराचे पाणी शिरले. विरली येथील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून चार घरांची पडझड झाली. नंदू चुटे, रसिका मेश्राम, सागर फुंडे आणि गोरोबा वकेकार यांची घरे कोसळली. हे चारही कुटुंब उघड्यावर आले आहे. घरातील अन्नधान्य पुर्णत: नष्ट झाले. लाखांदूर-पवनी रस्त्यावर गुढघाभर पाणी साचल्याने वाहतूक बंद होती. तसेच विरली-ईटान मार्गावरील वाहतूक बंद होती. शुक्रवारी सुमारे दोन तास पावसाचा तडाखा बसला. अनेक गावातील वीज पुरवठाही खंडित झाला. पालांदूर परिसरात गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतशिवारातून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी,नाले दुथडी भरून वाहत आहे.
तुमसर तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरले. परसवाडा येथील मामा तलावाचे पाणी प्रकाश डोरले, मिनाक्षी हटवार, मोरेश्वर हटवार, मिराबाई हटवार यांच्या शेतात शिरले. त्यामुळे त्यांच्या भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले. पवनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सकाळी ६.३० वाजताच जोरदार पावसाला सुरूवात झाली. ओढे दुथडी भरून वाहत होते. पवनी येथील डिजिटल पब्लिक स्कूलच्या प्रांगणाला तलावाचे स्वरूप आले होते तर अंगणवाडी केंद्रातही पाणी शिरले होते.
लाखांदूर तालुक्यातील कुडेगावला पुराचा वेढा पडला होता. हजारो हेक्टर धानपिकात पाणी शिरले. अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानाचा अनेकांना फटका बसला. अनेकांचे संसार या पावसामुळे उघड्यावर आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदी तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे प्रशासनाने सर्वेक्षण करून तात्काळ बाधीतांना सर्वाेतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूर परिस्थितीचा आढावा घेत पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे सांत्वन केले. जिलह्यात यावर्षीचा जोरदार पाऊस शुक्रवारी बरसला असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती आणखी दोन दिवस पाऊस बरसण्याच्या इशाराने नागरिकांची पाचावरधारण बसली आहे.
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाचा जलस्तर वाढत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता १९ दरवाजे दीड मीटरने तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. या प्रकल्पातून ९२३४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.
वैनगंगा धोक्याच्या पातळीवर
भंडारा शहरातून वाहणारी वैनगंगा धोक्याच्या पातळीपर्यंत वाहत होती. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कारधा येथील पुलावर वैनगंगेची पातळी ९.४२ मीटर नोंदविण्यात आली. मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात पाऊस कोसळत असल्याने संजय सरोवरसह इतर प्रकल्पाचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे वैनगंगेचा जलस्तर वाढला आहे. यामुळे नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.