जिल्ह्याला पावसाने झोडपले; शेतपिकाचे नुकसान, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:48 PM2023-07-17T13:48:59+5:302023-07-17T13:49:39+5:30

सरासरी ४२ मिमी पाऊस : ऑरेंज अलर्ट

Rain lashed Bhandara district; Crop damage, vigilance warning to riverside villages | जिल्ह्याला पावसाने झोडपले; शेतपिकाचे नुकसान, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्याला पावसाने झोडपले; शेतपिकाचे नुकसान, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

भंडारा : जिल्ह्यात गत ३६ तासांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यात सरासरी ४२ मिलिमीटर पाऊस बरसला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद लाखनी व साकोली तालुक्यात करण्यात आली.

गत २४ तासांत बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ४०.४ मिमी, मोहाडी ३०, तुमसर २४.४, साकोली ५५, लाखांदूर ४१.३ तर लाखनी तालुक्यात ५१.१ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत असल्याने रोवणीच्या कामालाही वेग आला आहे. जिल्ह्यासह सीमावर्ती भागात मुसळधार पाऊस बरसत आहे.

मध्य प्रदेशातही सातत्याने पाऊस पडत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात संजय सरोवरासह पुजारीटोला व बावनथडीचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे भंडारा, वैनगंगा, कारधा नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. सध्या कारधा, वैनगंगा नदीची पातळी २४३.३४ मीटर इतकी आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय नदीतून कुणीही प्रवास करू नये अशी सूचनाही निर्गमित करण्यात आली आहे.

रोवणी कामाला गती

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसल्याने रोवणीच्या कामाला जोमाने प्रारंभ झाला आहे. पऱ्हे काढण्याचे काम सुरू असून चिखलणी यंत्राच्या साहाय्याने जोमात सुरू आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त पाणी बाध्यांमध्ये जमा झाल्याने पऱ्हे व रोवणी सडण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे धानपिकांचे नुकसान

मागील दिवसात गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातील पाणी आवश्यकतेपेक्षा जास्त सोडल्याने शेतातील धानपीक पाण्याखाली आले आहे. शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट कोसळले असताना नुकसान भरपाई देण्याची मागणी नवेदनातून करण्यात आली आहे. इंदिरा सागर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून परिसरातील शेतीला पाणी व्हावे म्हणून वितरिका तयार करण्यात आल्या.

सप्ताहात कालव्यातून गरजेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने बामणी-रुयाड- सिंदपुरी गावच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील उभ्या पिकात पाणी शिरल्याने धानाची पन्हे पाण्याखाली येऊन सडली आहेत. जवळपास २ ते ३ फूट पाणी साचल्याने आवत्या धानदेखील पूर्णपणे पाण्यात दबून नुकसानीचे करण ठरले आहे. पंचायत समिती सदस्य बादल ठवरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक मदत द्यावी तसेच डाव्या कालव्यातून येणाऱ्या उपकालव्याची लांबी एक मीटरने वाढवून नदी पात्रापर्यंत न्यावी अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सखल भागात शिरले पाणी

भंडारा शहरातही मुसळधार पाऊस बरसला. रात्रीपासुन सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत कायम होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे भंडारा शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. वैशाली नगर, रुक्मीणी नगर, शीवनगरी या भागातील बहुतांश घरामध्ये व व्यापारी प्रतिष्ठानात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना घर सोडुन बाहेर यावे लागले. दुकानातील साहित्यही मोठ्या प्रमाणात ओले झाल्याने नुकसान झाले. खात रोड मार्गावरील आनंद मंगल कार्यालयात तीन ते चार फुट पाणी शिरले. नालीवर अतिक्रमण केल्याने उद्भवलेल्या या समस्येने नगरवासी त्रस्त झाले आहेत. अशी स्थिती भंडारा शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातही झाली आहे. रस्ता उंच व नाली खाली झाल्याने अक्षरश: पावसाचे पाणी घरात शिरले, त्यामुळे विषारी श्वापदांचाही धोका बळावला आहे. बांधकाम करताना अंदाज का घेण्यात आला नाही. अशी ओरड आहे.

वैनगंगा वाहतेय इशारा पातळीवर

मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस बरसल्याने संजय सरोवराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी ३६ तासात वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. सद्यस्थितीत वैनगंगा इशारा पातळीवर वाहत असुन त्याची पातळी २४३.३४ मीटर इतकी आहे. शहराला पुराचा धोका होऊ नये म्हणुन गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी ३१ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. पुढील दिवसही पावसाचे असल्याने नदीतून प्रवास करणे टाळावे असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

Web Title: Rain lashed Bhandara district; Crop damage, vigilance warning to riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.