पाऊस मुक्कामी; धान पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 09:45 PM2022-10-18T21:45:38+5:302022-10-18T21:46:12+5:30
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत १५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १२१ टक्के पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या २१ टक्के पाऊस अधिक कोसळला आहे. दरवर्षी साधारणत: ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जातो. मात्र, यंदा दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री भंडारा शहरासह जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : साधारणत: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परत जाणारा पाऊस अद्यापही मुक्कामी असल्याने संपूर्ण धानपीक पाण्याखाली आले आहे. दररोज कोसळणाऱ्या पावसाने कापणीची कामे खोळंबली आहेत. दिवाळीच्या पर्वात पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिलीमीटर आहे. यावर्षी आतापर्यंत १५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत १२१ टक्के पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या २१ टक्के पाऊस अधिक कोसळला आहे. दरवर्षी साधारणत: ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस परत जातो. मात्र, यंदा दररोज जिल्ह्यात कुठे ना कुठे पाऊस कोसळत आहे. सोमवारी रात्री भंडारा शहरासह जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. भंडारा तालुक्यात गत २४ तासांत १०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर लाखनी तालुक्यात ४६.६ मिलीमीटर पाऊस कोसळला. पवनी १.२ मिलीमीटर, साकोली २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सध्या हलक्या प्रतीचा धान कापणीला आला आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी कापणी करून विक्रीच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप पाऊस थांबायचे नाव घेत नाही. दररोज पाऊस कोसळत असल्याने कापणीच्या कामाला ब्रेक लागला आहे. कापणी झालेल्या धानाच्या कडपा पावसात ओल्या होत आहेत. बांधीत अद्यापही पाणी साचून असल्याने कापणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. शेतात आजही सर्वत्र पाणी दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५८८ मिमी पाऊस कोसळला आहे. तो वार्षिक सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक आहे. सर्वाधिक पाऊस मोहाडी तालुक्यात १७२६.८ मिमी कोसळला आहे. हा तालुक्याच्या सरासरीच्या १३९ टक्के आहे. तर तुमसर तालुक्यात १७१४.४ मिमी पाऊस कोसळला असून वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के आहे. भंडारा तालुक्यात १६३३.८ मिमी, पवनी १४२७.२ मिमी, साकोली १६२०.४ मिमी, लाखांदूर १६००.२ मिमी, लाखनी १३९३.३ मिमी पाऊस कोसळला आहे. १ जून ते १८ ऑक्टोबरपर्यंत १३०९ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, त्यापेक्षा अधिक पाऊस कोसळला असून अद्यापही पाऊस थांबायचे नाव नाही.
नऊ वर्षांपूर्वी नोव्हेंबरपर्यंत कोसळला पाऊस
सध्या दररोज कोसळणाऱ्या पावसाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र, अशीच स्थिती २०१३ मध्ये झाली होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत होता. या पावसाने त्याही वेळी मोठे नुकसान झाले होते. यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली असून, दररोज पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्याला यलो अलर्ट
- हवामान खात्याने जिल्ह्याला पुन्हा यलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर १९ ते २२ ऑक्टोबरपर्यंत इशारा दिला नाही. परंतु, यंदा हवामान खात्याचा अंदाज चुकवत दररोज पाऊस कोसळत आहे.