८२ दिवसांत बरसला ७१% पाऊस

By admin | Published: August 22, 2016 12:22 AM2016-08-22T00:22:43+5:302016-08-22T00:22:43+5:30

मागीलवर्षीच्या ७७३.७ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.

Rainfall at 71% in 82 days | ८२ दिवसांत बरसला ७१% पाऊस

८२ दिवसांत बरसला ७१% पाऊस

Next

सरासरी ६५५ मिमी पाऊस : वार्षिक सरासरी गाठणे अशक्य
देवानंद नंदेश्वर भंडारा
मागीलवर्षीच्या ७७३.७ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६५५.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २१ आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७१ टक्के आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या ७१ दिवसांत ६७४ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात रोवणी ७० टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार २१ आॅगस्टपर्यत जिल्ह्यात ९१८.६ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ६५५.९ मिमी पाऊस पडला आहे.
सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. पावसाळ्याचे आता केवळ दोनच महिने शिल्लक असताना ६५५.९ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे.
पावसाच्या पाच महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता भंडारा तालुक्यात आॅक्टोेंंबर अखेरपर्यंत १,२६०.८ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ५७०.१ मिमी पाऊस पडला आहे. मोहाडी तालुक्यात १,२६०.८ मिमी पावसाची अपेक्षा असताना ६१० मिमी, तुमसर तालुक्यात १,२६०.८ मिमीऐवजी आतापर्यंत ८६७.९ मिमी पाऊस झाला. पवनी तालुक्यात १,२२७.४ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ ६४६ मिमी पाऊस पडला आहे. साकोली तालुक्यात १,३९९.१ मिमीच्या तुलनेत केवळ ७६१.२ मिमी, लाखांदूर तालुक्यात १,४५१.३ मिमीच्या तुलनेत ४८७.६ मिमी व लाखनी तालुक्यात १,४५१.३ मिमी पडतो. मात्र आतापर्यत ६४ टक्के म्हणजे ६४८.६ मिमी पाऊस झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी संभ्रमावस्था आहे.

लाखांदुरात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यातील तालुकानिहाय वार्षिक सरासरी पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास लाखांदूर तालुक्यात सर्वात कमी ४८ टक्के तर भंडारा ६५, मोहाडी ७० टक्के, तुमसरमध्ये ९९ टक्के, पवनीत ७८, साकोली ८०, लाखनीत ७१ टक्के पाऊस पडला आहे.
पावसाची दडी, खरीप पिके करपली
आॅक्टोंबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी श्रीकृष्ण जन्माष्ठमीनंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. येत्या ३ दिवसांवर आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्ठमीपर्यंत असा किती पाऊस पडणार याची काळजी सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी पाऊस वगळता अनेक ठिकाणी अनेक दिवसात पावसाने हजेरी लावलेली नाही. उलट चक्क ऊन पडत आहे. त्यामुळे कोवळी पिकं पाण्याअभावी माना टाकत आहेत.

Web Title: Rainfall at 71% in 82 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.