धानाच्या कोठारात पावसाने केला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:42+5:30
आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परतीच्या पावसाचा जोर अजून कमी झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या धान पिकावर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे.
कोंढा येथे नासाडी
कोंढा-कोसरा : कोंढा परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने धान पिकाला त्याचा फटका बसला आहे. अनेकांची धानपिकाची कापणी सुरु असून पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. दररोज ढगाळ वातावरण दिसत आहे. आकाशात अचानक ढग जमा होऊन पाऊस कोसळत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोंढा येथे दुपारी २ वाजता दरम्यान शनिवारला जोरदार पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे शेतात पावसाचे पाणी साचले. यामुळे कापणी सुरु असलेले धान पीक प्रभावित झाले. कडपा पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, परतीच्या पावसाचा जोर अजून कमी झाला नाही. दररोज आकाशत ढग जमत आहेत. त्यामुळे केव्हाही पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पहावयास मिळते आहे. आधीच यावर्षी अतिवृष्टी झाल्याने धानपिकास मोठा फटका बसला आहे. यातच कीडींचा प्रादूर्भाव यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. दिवाळी सारखा सण लोक साजरा करीत असताना परिसरात शेतकरी आपल्या शेतात जावून पावसाने ओलेचिंब झालेले धानाचा कडपा बाहेर काढत असल्याचे दृष्य दिसते आहे.
धानाच्या कडपा भिजल्या
पालांदूर चौ. : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक भूईसपाट केले. बºयाच ठिकाणी कडपा ओला झाला आहे. ऐन दिवाळीत निसर्गाच्या दृष्टचक्राने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हिसकावला आहे. पीक विम्याचा लाभ व्हावा याकरिता प्रशासनासह शासनाने प्रामाणिकता दाखवावी अशी आर्त हाक बळीराजाने दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावली. यात धान जमीनदोस्त झाले. यामुळे धान अंकुर शक्य असल्याने नुकसान होणे ठरले आहे.
पीक विम्याचा कडपा भिजल्यास नुकसान मिळणे शक्य आहे. मात्र तीन दिवस शासकीय सुटी असल्याने शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे होणार का? हा प्रश्न आहे. २४ तासात पंचनामे होणे गरजेचे असल्याचे पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. यावर काय मार्ग काढावा याचा पीक विमा कंपनी कृषी विभाग, महसूल विभाग यांनी विचार करीत शेतकºयांना पीक विमा मंजूर करावा. शेतकऱ्यांच्या मदतीला लोकप्रतिनिधीनी प्राधान्य देत संकटकालीन स्थितीत सहकार्य करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून उमटत आहे.
लाखनी तालुक्यात नुकसान
लाखनी : लाखनी परिसरात बरसलेल्या परतीच्या पावसाने धान उत्पादक शेतकºयांना दगा दिला. अवकाळी पावसाने शेतात कापून ठेवलेला धान व कापणीसाठी सज्ज असलेल्या धान पिकांची नासाडी झाली आहे. हातात आलेले पीक पाहुन शेतकरी सुखावला होता. तोंडात जाणारा घास हिरावून घ्यावा अशी परिस्थिती धान उत्पादक शेतकºयाची झाली आहे. दिवाळीच्या एक दिवस अगोदर पाऊस बरसल्याने आनंदात जाणारी दिवाळी सणावर पाणी फेरले. धान उत्पादक शेतकºयांचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेद्वारे मनोज पटले यांनी केली आहे.
लाखनी तालुक्यात धानपिकाची नासाडी झालेल्या भागाची पाहणी करुन पिक विम्याची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ मौका पंचनामा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काढलेले धान सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांत टाकले आहे. कापलेले धान ओले चिंब झाल्याने त्यावर सुचेल तो उपाय शेतकरी करताना दिसत आहे. अड्याळजवळील नेरला गावातील एक शेतकरी व सोबत मुलीची मदत घेत बैलांच्या सहाय्याने धान चुरणा करताना दिसत होते. ओले धान लवकर वाढावे, यासाठी हा पर्याय करण्याचे कारण यावेळी शेतकºयांनी सांगितले. शेतकरी मोठ्या आशेने पीक घेतो. मात्र निरनिराळ्या कारणाने बळीराजाला तोंडघशी पडावे लागते. कधी एका पाण्याने तर कधी रोगराईने तर कधी सर्व बरोबर असताना सुध्दा निसर्गाच्या लहरीपणा मुळे शेतकºयाच्या पदरात नेहमीच निराशा पडते. ऐन दिवाळीच्या सणाला आनंदाच्या क्षणाला शेतकरी मात्र शेतातील ओले झालेले पीक मोठ्या दु:खाने धान पीक सुरक्षित ठिकाणी नेण्यात मग्न आहे. दरवेळी अड्याळ व परिसरातील असंख्य गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात आज हाहाकार दिसतं आहे. नेमके कारण म्हणजे परतीचा बरसलेला आलेला पाऊस यामुळे काहीच्या शेतातील धानपीक जमीनदोस्त झाले तर कुणाचे कापलेले धान पीक पाण्यात भिजले यासाठी प्रत्येक शेतकरी आज आपल्या शेतात दिसत आहे. युध्द स्तरावर शेतकरी राबताना दिसत आहे आणि यासाठी घरातील लहान मुलेही कामाला लागली आहे.
शासन स्तरावर तालुका प्रशासनाने तात्काळ पाहणी करावे अशी मागणी शेतकरी करत असले तरी पिक पाहणी झाल्यावरही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना तात्काळ होत नसेल तर त्या पीक पाहणीचा उपयोग तरी काय असाही सवाल यावेळी काही शेतकरी बांधव करताना दिसतात. नवनियुक्त आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी अड्याळ व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.