पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

By Admin | Published: March 15, 2016 01:08 AM2016-03-15T01:08:27+5:302016-03-15T01:08:27+5:30

दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह

Rainfall in Palandur, Asanga area | पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

googlenewsNext

पालांदूर : दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. परिसरात ४७.६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. जीव धोक्यात घालून शेतमालांची जपवणूक करण्याकरिता धावपळ केली. हलक्या स्वरुपाची गारपीट झाली. परंतु नुकसान समजले नाही. गहू व चना पिकाला सुमार नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पाऊस व गारपीट अपेक्षितच होती. बागायतीमध्ये वांगा पिकाला झोडपले असून शेतात पाणी साचले आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा त्रास वाढणार हे निश्चित आहे. फुलकोबी खराब झाली असून भावात नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरडवाहू शेतीला या पावसाने पोषकता दिली असून खरीपाची तयारी करण्याकरिता सकारात्मकता मिळाली आहे. पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते.
महाशिवरात्री ते होळीच्या दरम्यान वातावरणात बदल अपेक्षित दिसतो. दोन वर्षापूर्वी खराशी, खुनारी, लोहारा, मचारणा, दिघोरी, पळसगाव आदी गावांना गारपिटीचा जबर दणका बसून घरांचे व शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले होते.
आसगावात वादळी पाऊस
आसगाव: पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने गव्हाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे मळणीची कामे खोळंबली आहेत.
सानगडी परिसरात वादळी पाऊस गारांसह
साकोली/सानगडी : सानगडी परिसरात सासरा, विहिरगाव (बु.), कटंगधरा, सालेबर्डी, सानगाव, शिवणीबांध, झाडगाव, सिरेगाव (बांध), सोमानपूर, गुढरी टोला आदी गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस बरसला. यात १६.१ मि.मी पावसाची नोंद झाली.
या पावसामुळे तूर, हरभरा, गहू, उळीद, लाखोरी, मिरची व भाजीपाला वादळामुळे भुईसपाट झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला. परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)

पावसाचा कांदा उत्पादनाला फटका
४चिचाळ : चिचाळ येथे गेल्या ५ ते ६ वर्षापासून येथील कांद्याची मागणी जिल्ह्याशिवाय पर जिल्ह्यातही वाढल्याने व कांदा पीक हे नगदी पीक असल्याने या वर्षाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र काल रात्री वादळी पावसाने झोडपल्याने शेतात पाणी साचल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे. मागील वर्षी चिचाळ येथील कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले असून अंदाजे ७०० एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच धान निघाल्यानंतर रब्बी पीक म्हणून गहू, हरभरा, वाटाणा, लाख, उळीद, मुग आदी पीके घेतली जात होती. ज्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी उन्हाळी धान पीक घेत होते. परंतु धानावर येणारी कीड, महागडे रासायनिक खताचे भाव व धानाला नसलेला भाव यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु कांदा या पिकाला धानापेक्षा पाणी व खर्च कमी लागत असल्यामुळे चिचाळ येथील शेतकरी कांदा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. चिचाळ परिसरात २८.२ मि.मी पाऊस बरसला.
४कांदा उत्पादन होत असले तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांचेकडे किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्याला विकावा लागतो हे व्यापारी कांदा दुप्पट, तिप्पट भावाने विकून नफा कमावित असतात. परंतु या भागात कांदा साठवणूकगृहाची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कोणताही राजकारणी पुढाकार घेताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या अकाली वादळी पावसाने कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून कांद्याची पाल जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारी उत्पन्न ऐन वेळेवर पावसाने हिसकावली तर शेतातील गहू, हरभरा, वाटाणा, उळीद, मुग, चना, लाख आदी रब्बी पिकांच्या कळपा व गंज्या पाण्यात सापडल्याने संपूर्ण फसल मातीमोल झाली आहे. शासनाने व स्थानिक जि.प. सदस्यांनी सदर परिसराची चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
४या संदर्भात कृषी सहाय्यक एकनाथ पाखमोडे यांचेशी संपर्क साधला असता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत कांदा साठवणूकगृह ही शासनाची ४० हजार रुपयाची योजना असून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिला जातो. यासाठी सातबारा, गाव नमुना, आठ अ, नकाशा रेकॉर्डला कांदा लागवड क्षेत्राची नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणूकगृह उपलब्ध होऊ शकते.

Web Title: Rainfall in Palandur, Asanga area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.