पावसाने शेवटच्या चरणात गाठली सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:15+5:302021-09-26T04:38:15+5:30
भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित ...
भंडारा जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधी १२४१ मिमी पाऊस अपेक्षित असताे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ११३५.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. हा पाऊस विद्यमान सरासरीच्या ९१ टक्के आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ ८७ टक्के सरासरी पावसाची नाेंद झाली हाेती. मात्र, शेवटच्या चरणात जाेरदार पाऊस बरसला. त्यामुळे सरासरी वाढली आणि प्रकल्पही तुडुंब भरले आहेत.
जिल्ह्यात मृग नक्षत्रातील पावसानंतर शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली हाेती. पावसाने दडी मारल्याने राेवण्या रखडल्या हाेत्या. मध्यंतरी हलक्या सरी बरसत हाेत्या. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी राेवणी केली. मात्र, बहुतांश राेवणी रखडली हाेती. दरम्यान झालेल्या पावसाने राेवणी पूर्ण झाली; परंतु त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला. १० सप्टेंबरनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, या पावसाचा फटका हलक्या धानाला बसला. लाेंब्या आलेला धान जमिनीवर झाेपला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. गत आठवड्यात तर माेहाडी आणि तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली. या शेवटच्या चरणातील पावसाने सरासरी गाठली. सध्याही ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हलका धान काढणीला आला असताना पाऊस काेसळत असल्याने नुकसान हाेण्याची माेठी भीती आहे.
बाॅक्स
सर्वाधिक पावसाची नाेंद माेहाडी तालुक्यात
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस माेहाडी तालुक्यात १४४३.८ मिमी काेसळला आहे. हा विद्यमान सरासरीच्या १२२ टक्के आहे. त्या खालाेखाल साकाेली तालुक्यात १२२०.९, लाखनी ११९३.३, लाखांदूर ११०५.६, तुमसर ९७६.६ आणि भंडारा तालुक्यात ९६७.३ मिमी पाऊस काेसळला. २१ सप्टेंबर राेजी तर माेहाडी तालुक्यावर आभाळच फाटले हाेते. अवघ्या २४ तासांत १४०.५ मिमी पावसाची नाेंद झाली. तलाव तुडुंब भरून अनेक शेतांत पाणी शिरले.
बाॅक्स
सर्वाधिक पाऊस झालेले सर्कल
माेहाडी १४४३.८ मिमी
आंधळगाव १२७६.४ मिमी
आसगाव १२१५.४ मिमी
करडी ११९४.० मिमी
मासळ ११८५.४ मिमी
वरठी ११३२.६ मिमी
पहेला ११११.८ मिमी