धानाच्या कोठाराला पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:38+5:302021-09-27T04:38:38+5:30
तुमसर: तुमसर तालुका हा धानाचे कोठार असुन परतीच्या पावसाने झोडपल्याने शेत शिवारातील धानपीक झोपले. त्याचा सर्वाधिक फटका हलक्या धाणाला ...
तुमसर: तुमसर तालुका हा धानाचे कोठार असुन परतीच्या पावसाने झोडपल्याने शेत शिवारातील धानपीक झोपले. त्याचा सर्वाधिक फटका हलक्या धाणाला पडला आहे. हलके धान कापणीला आले असताना पावसाने दगा दिला सध्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे त्यामुळे धान पान-फोल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.
खरीप हंगामात पावसाने सुरुवातीला दगा दिल्यानंतर बऱ्यांपैकी पाऊस पडला हलके धान कापणीला आले असताना परतीच्या पावसाने झोडपले यामुळे हलक्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. नाका डोंगरी, सिहोरा, देव्हाडी, गोबरवाही, आष्टी, लोभी, बघेडा परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतशिवारात धान झोपले आहे. त्यामुळे धान पानफोल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, धानपीक झोपल्यामुळे धान सडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. धान कापणीनंतर ते ठेवावे कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. धानाच्या लोंब्या अनेक ठिकाणी गळून पडल्या असून, केवळ शेतात आता तणससारखे धान उभे आहे. धान पिकाला लावण्यात आलेला खर्च निघेल किंवा नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तुमसर तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही असे प्रशासनाची आकडेवारी सांगत आहे, परंतु प्रत्यक्ष बांधावर मात्र वेगळेच चित्र दिसत आहे यामुळे तुमसर तालुक्यातील धान पिकाचे प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्री व राज्यांच्या कृषीमंत्र्यांकडे केली आहे.