भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:42 PM2021-09-21T12:42:12+5:302021-09-21T13:06:35+5:30
भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी शहरातील रस्ते व नाले जलमय झाले असून अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
भंडारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी येथे सकल भागातील अनेक घरात पाणी शिरले. तर, गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस बरसल्याने प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने चार दिवस सतत पाऊस पडणार असल्याचे अंदाज वर्तवला असताना आज सलग दुसऱ्या दिवशी भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मोहाडी शहरातील रस्ते व नाले जलमय झाले असून अनेक भागातील घरात पाणी शिरले आहे. सततच्या पावसामुळे गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. यातील १३ दरवाजे एक मीटरने तर २० दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी तसेच केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार धरणामधुन सध्या २५४६ क्युमेक्स ने सुरू असलेला विसर्ग सकाळी ७ पासून ५ वाजेपर्यंत ५००० क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधून आवागमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.