रेनवॉटर हार्वेस्टिंगमुळे पाणी टंचाईवर मात
By admin | Published: March 19, 2016 12:26 AM2016-03-19T00:26:47+5:302016-03-19T00:26:47+5:30
दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात.
लोकमत शुभवर्तमान : कावळे यांचा पाणी जिरवा, पाणी निर्माण करण्याचा संदेश
भंडारा : दुष्काळ, पाणी टंचाई, पाण्यासाठी महिलांची भटकंती, अशा बातम्या दररोज ऐकायला मिळतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा बसल्यावरच आपल्याला जाग येते आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठी आपण सरसावतो. पाणी उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचेच काम आहे म्हणून आपण जबाबदारी झटकून मोकळे होतात. परंतु भंडारा शहरातील नारायण कावळे यांनी आपली जबाबदारी ओळखून पावसाच्या प्रत्येक थेंबाचे पुनर्भरण करून त्यांच्या कॉलनीतील पाणी टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे.
भंडारा शहरातील खात मार्गावर १५ वर्षांपासून राधाकृष्ण विहार कॉलनी ही नवीन वसाहत वसलेली आहे. भूस्तरीय खडकामुळे या भागातील काही भागात जलस्तर चांगला तर काही भागात ३०० फूट खोलीवरही पाणी नाही.
कावळे हे सार्वजनिक बांधकाम विभागात ड्राफ्ट्समन म्हणून कार्यरत होते. त्यांनी या परिसरात घर बांधण्यासाठी नगरपरिषदकडे घराचा नकाशा मंजुरीसाठी दिला. तेव्हा त्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची अट घातली होती. पालिकेने मंजूर केलेल्या प्रत्येक नकाशात अशी अट घातली जाते. घरबांधणी करण्यापूर्वी नकाशातील रेनवॉटर हार्वेस्टिंगनंतर कुठे जाते हा प्रश्न निर्माण होतो.
नारायण कावळे यांनी मात्र या अटीचे तंतोतंत पालन केले. त्यांनी पावसाचे इमारतीच्या छतावर पडणारे सर्व पाणी पाईपद्वारे विहिरीत सोडले. छतावरील धूळ , कचरा, थेट विहिरीत जाऊ नये म्हणून त्यांनी छोट्या टाकीचा फिल्टरसारखा वापर केला. त्यामध्ये जाड आणि बारीक वाळूचा थर दिला.
छतावरील पाणी पाईपद्वारे प्रथम या टाकीत जमा होते आणि फिल्टर झालेले पाणी दुसऱ्या पाईपद्वारे विहिरीत सोडले जाते. मागील आठ वषार्पासून कावळे सतत अशाप्रकारे त्यांच्या घरातील विहिरीचे पुनर्भरण करतात. त्यामुळे त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी असते. यासाठी त्यांनी केवळ दीड हजार रुपये खर्च केले आहे. याच विहिरीतून त्यांनी शेजारच्या पाच-सहा घरांना उन्हाळ्यात पाणी पुरवठा केला. परंतु मागील दोन वर्षांपासून त्यांना शेजारच्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही, कारण कावळे यांची प्रेरणा घेऊन कॉलनीतील इतर लोकानीही जल पुनर्भरणाचा प्रयोग त्यांच्या घरीसुद्धा राबविला. आश्चर्य म्हणजे आजुबाजूच्या विहीरीना आता मुबलक पाणी आहे.
कावळे यांच्या घरी स्वयंपाक घरातील पाणीसुद्धा वाया न घालवता ते पाणी बागेत सोडले जाते. मुख्य म्हणजे अंगणात केवळ चालण्यापुरती फरशी बसवून पावसाचे संपूर्ण पाणी अंगणातच जिरवले जाते. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे अंगणात पडणारा धो-धो पाऊस वाहून जातो. मात्र तो तिथेच जिरवला तर भूजलस्तराच्या पातळीत निश्चितच वाढ दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)
- तरच पाणीटंचाईवर होणार मात
राधाकृष्ण विहार कॉलनीतील रहिवाशांनी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करुन त्यांच्या कॉलनीतील दुष्काळी परिस्थितीवर अशाप्रकारे मात केली आहे. आपणही आपली जबाबदारी ओळखून पावसाचा प्रत्येक थेंब वाचवला, तो जमिनीत जिरविला तरच पाणी टंचाईसोबतच दुष्काळावरही कायमस्वरूपी मात करणे शक्य आहे.