पावसाची हजेरी
By admin | Published: September 15, 2015 12:29 AM2015-09-15T00:29:53+5:302015-09-15T00:29:53+5:30
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली.
धो-धो बरसला : धानपिकाला मिळाली नवसंजीवनी
भंडारा : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धानपिके करपण्याच्या मार्गावर असताना लाखांदूर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. साकोली व लाखनी तालुक्यात अर्धा तास पाऊस झाला. भंडाराजवळील शिंगोरी ते लाखनी या दरम्यान धो-धो पाऊस बरसला. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
लाखांदुरात जोरदार पाऊस
लाखांदूर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांपासून पावसाअभावी धानपिके करपत होते. आज सोमवारला सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे भाव दिसले.
मागील १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे लाखांदूर तालुक्यातील धानपिक करपू लागले होते. इटियाडोह धरणात अत्यल्प पाणी साठा असल्याने मुबलक पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे नाले व खड्यातील पाणी वापरून शेतकऱ्यांनी धानपीक जिवंत ठेवण्याचा केविलवाणा प्रयोग सुरु केला होता.
हातचे पीक जाणार म्हणून शेतकऱ्यांनी हिंमत सोडली असताना सायंकाळच्या सुमारास विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात कोरडवाहू शेती सोबतच सिंचनाखालील धान पिकांना नवी संजीवनी मिळाली.
साकोलीत अर्धा तास पाऊस
साकोली तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस बरसला. या दरम्यान वीजा कडाडल्या. अर्धा तासानंतर पाऊस बंद झाला. उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. (लोकमत चमू)
उकाड्याने नागरिक हैराण
मासळ परिसरात पावसाच्या दीर्घकालीन विश्रांतीने वातावरणात उकाडा वाढला आहे. १५ ते २० दिवसांपासून परिसरात पाऊस बेपता झाला आहे. वातावरण बदलामुळे ऊन्ह तापत असून उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीसुद्धा १० ते ११ वाजेपर्यंत उकाडा कायम राहत असल्याने शाळकरी मुलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असह्य उकाड्यामुळे ताप, सर्दी, दुखणे, उलट्या अशा आजरांनी सुद्धा लोकांना ग्रासले आहे. त्यामुळे विशेषत: शालेय विद्यार्थी व लहान मुले यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊन त्यांच्या शाळेतील उपस्थितीवर फरक पडला आहे. वातावरणात बदल झाल्याने असह्य उकाड्याने अक्षरश: घामाच्या धारा वाहत असून नागरिक मात्र हैराण झाले आहेत.(वार्ताहर)