धानपीक संकटात; बळीराजा चिंतातुर
By admin | Published: September 9, 2015 12:40 AM2015-09-09T00:40:47+5:302015-09-09T00:40:47+5:30
खरीपात निसर्ग लहरीपणाने वागत असल्याने पावसाळा हक्काचा उरला नाही. जीवघेण्या उन्हाने धानाला पाणी अधिक लागत आहे तर पाऊसच पडत नसल्याने चिंता वाढली आहे.
अळीचे आक्रमण : पाऊस बेपत्ताच
पालांदूर : खरीपात निसर्ग लहरीपणाने वागत असल्याने पावसाळा हक्काचा उरला नाही. जीवघेण्या उन्हाने धानाला पाणी अधिक लागत आहे तर पाऊसच पडत नसल्याने चिंता वाढली आहे. अती उन्हामुळे अळीचे साम्राज्य वाढत आहे. हल्लीचे वातावरणात तुळतुळ्याला पोषक हवामान मिळत असल्याने रोजच बळीराजाला धानाची पाहणी करावी लागत आहे. धानाचे पीक संकटात सापडले असून यातून वाचविण्याकरिता श्रीकृष्णाला साकडे घातले आहे.
खरीपात धान हे मुख्य पीक. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व अर्धा नागपूर जिल्ह्यात धानपिक घेतल्या जाते. मागील ३ वर्षाचा ओला, कोरडा दुष्काळ डोक्यावर असताना याही वर्षी पाऊस अत्यल्पच पडला असून परतीचा वेध जाणवत आहे. स्पष्ट ऊन, दाट धुके पाहता पाऊस जाण्याचे संकेत दिसत आहे. हलक्या धानाला पावसाची नितांत गरज आहे. लाखनी तालुक्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडल्याने आॅगस्ट अखेरपर्यंत रोवणी १०० टक्के आटोपली. मंडळ अधिकारी टिकेश्वर गिऱ्हेपुंजे व तलाठी नरेश पडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार किटाडी, इसापूर, गुरठा, पालांदूर, खराशी हलक्यातील ६४५५ हेक्टर क्षेत्रात खरीपाचे नियोजन असून ५०७७ हेक्टरात रोवणा १३७८ हेक्टर आवत्या पद्धतीने धान लावले आहे. पेरणी व रोवणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे. इतर पीक ३१७ हेक्टरवर असून यात भाजीपाला, तूर, ऊस, केळ आदीचे नियोजन केले आहे. पावसाची नितांत गरज असून तापमान ३५ से. एवढे असल्याने मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम दिसत आहे. महागडी औषधे, खते, रोवणी, निंदन आटोपली असून खर्च वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंतातूर झाला आहे. (वार्ताहर)
धानाला २३०० रु. चा भाव
पालांदूर : मागील वर्षापासून बारीक धानाला भाव नसल्याने शेतकरी व्यापारी मरणासन्न अवस्थेत जगत होता. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे धानाचा शेतकरी, व्यापारी संकटात आला आहे. मागील हप्त्यात जिल्ह्यात सर्वात मोठ्या तुमसर बाजारपेठेत धानाला मागणी आल्याने बारीक धान आता २३०० रुपये प्रतीक्विंटलने व्यापारी खरेदी करीत आहे. ठोकळ धान हमी केंद्रात विकत असल्याने व २५० रुपये बोनस शासनाने दिल्याने ठोकळ धान वेळीच विकल्या गेला. मात्र बारीक धान ज्यात जय श्रीराम, एच.एम.टी., पिंटू, आर.पी.एन., श्रीराम सारथी यासारखी धान शेतकऱ्याच्या कोठारात पडून होती. भाव पडून राहिल्याने धान तसेच उंदिर घुस यांच्या संगतीने वाढीव भावाच्या अपेक्षेने कोठारग्रस्त झाली असताना ३-४ दिवसापासून भावात तेजी आल्याने धान खरेदीला मुहुर्त मिळाला आहे. बारीक म्हणजे फाईन (उत्कृष्ट दर्जा) धानाला ४००० रुपये एवढा भाव प्रतिक्विंटल अपेक्षित आहे. मात्र धान व्यापारी पिसाई करून भेसळचा सूत्र वापरून अपेक्षित नफा कमावितो.