ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकावर पावसाचा प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:03 PM2018-08-27T23:03:31+5:302018-08-27T23:03:50+5:30
देशात सध्या बुलेट ट्रेन व मेट्रो ट्रेनची धुम सुरु आाहे. परंतु ब्रिटीशकालीन तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावर अपुऱ्या शेडअभावी वृक्षाचा आसरा घ्यावा लागतो. अनेक प्रवाशांना भर पावसात ओलेचिंब होऊन गाडीत प्रवेश करावा लागतो. सोमवारी एका तान्हुल्याला त्याच्या आईने कापडात गुंडाळून पावसापासून बचाव करताना दिसली. जागतिक दर्जाच्या सेवा पुरविण्याचा रेल्वेचे दावा येथे फोल ठरला आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देशात सध्या बुलेट ट्रेन व मेट्रो ट्रेनची धुम सुरु आाहे. परंतु ब्रिटीशकालीन तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावर अपुऱ्या शेडअभावी वृक्षाचा आसरा घ्यावा लागतो. अनेक प्रवाशांना भर पावसात ओलेचिंब होऊन गाडीत प्रवेश करावा लागतो. सोमवारी एका तान्हुल्याला त्याच्या आईने कापडात गुंडाळून पावसापासून बचाव करताना दिसली. जागतिक दर्जाच्या सेवा पुरविण्याचा रेल्वेचे दावा येथे फोल ठरला आहे.
मुंबई-हावडा मार्गावर ब्रिटीशकालीन तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानक आहे. सदर रेल्वे स्थानकावर पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे. येथून तिरोडी येथे प्रवाशी गाडी दिवसातून चारवेळा जाते. मॅग्नीज ओर इंडिया खाणीतील मॅग्नीजची ने-आण नियमितपणे येथून होते. परंतु हजारो प्रवाशांना येथील रेल्वे स्थानकावर मात्र मूलभूत सोयी सुविधा प्राप्त होत नाही. मुख्य स्थानकावर मोठे शेड आहे. प्रवाशी गाड्यांच्या डब्याची संख्या २२ ते २४ इतकी असते. त्यामुळे प्रवाशांना विना शेडनेच पावसाळ्यात गाडीची प्रतीक्षा करावी लागते.
प्रवाशी गाडी रेल्वे स्थानकात दाखल होण्यापूर्वीच शेकडो प्रवाशी धावत धावत संबंधित डब्याच्या दिशेने जातात. दरम्यान पावसाळ्यात व उन्हाळ्यात त्याचा फटका बसतो. महिला, वृद्ध, पुरुष, महिला, लहान मुलांना त्याचा मोठा त्रास व धोका पत्करावा लागतो. सोमवारी एक महिला आपल्या तान्हुल्याला पावसापासून बचावाकरिता एका कापडात गुंडाळून प्रवाशी गाडीत प्रवेश करताना दिसली. या दृष्याने अनेकांचे हृदय हेलावून गेले. ओलेचिंब होऊन ती महिला आपल्या चिमुकल्याला पावसापासून बचाव करताना धडपड करीत होती.
हजारो रेल्वे प्रवाशी दररोज या रेल्वेस्थानकातून प्रवास करतात. लाखोंचा महसूल रेल्वे प्रशासनाला येथे प्राप्त होतो. किमान संरक्षणाकरिता शेड येथे अजूनपर्यंत तयार केले नाही. अनेक प्रवासी येथे स्थानकावरील वृक्षाच्या खाली गाडीची प्रतीक्षा करताना येथे दिसतात. नागपूर रेल्वे स्थानकानंतर क्रमांक चारचे हे रेल्वे स्थानक आहे. कोट्यवधींचा महसूल व जंक्शन रेल्वेस्थानकाचा क्रमांक मात्र एनएसजी ५ (ड) ग्रुपमध्ये येतो अशी माहिती आहे. याउलट भंडारा, गोंदिया ही रेल्वेस्थानके गट अ मध्ये येतात. किमान तुमसर रोड रेल्वेस्थानक गट ब मध्ये आतापर्यंत येण्याची गरज होती. मात्र तसे होत नाही.
तुमसर रोड रेल्वे स्थानकाची आर्थिक उत्पन्न कमी असल्याने त्याचा समावेश एनएसजी-५ मध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वे सोयी सुविधा पुरविते. अन्य सुविधेकरिता आर्थिक उत्पन्न वाढले पाहिजे.
-राजेश गिरी, स्टेशन अधीक्षक, तुमसर रोड, जंक्शन.
तुमसर रोड रेल्वे जंक्शन असून त्याचा समावेश ड गटात करण्यात आला आहे. नागपूर विभागात गोंदिया राजनांदगाव नंतर तुमसर रोड आर्थिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक आहे. किमान शेडची येथे उभारणी करावी. आर्थिक उत्पन्न प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.
-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.