पावसाची आश्वासक हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:20 PM2019-06-28T22:20:18+5:302019-06-28T22:20:41+5:30
आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांची असाह्य उकाड्यातून सुटका झाली. तर मोहाडी आणि लाखनी तालुक्यात वीज कोसळून सात जनावरे ठार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांची असाह्य उकाड्यातून सुटका झाली. तर मोहाडी आणि लाखनी तालुक्यात वीज कोसळून सात जनावरे ठार झाली.
जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीची कामे ठप्प झाली होती. दरम्यान हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पावसाला प्रारंभ झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग आले. विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात दुपारी २.१५ वाजता जोरदार पावसाला प्रारंभ झाला. अर्धा तास बरसलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी वाहून गेले. गुरूवारी पहाटे भंडारा शहरात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. या तालुक्यात वीज कोसळून पाच जनावरे ठार झाली. रोहणा परिसरात एक गाय तर खोडगाव येथे एक म्हैस आणि वगार तर पारडी येथे प्रेमलाल झंझाड यांच्या मालकीच्या दोन म्हशी ठार झाल्या. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात मºहेगाव येथे गाय आणि कालवट ठार झाली. भंडारा तालुक्यातील शहापूर, पवनी तालुक्यातील मासळ परिसरातही दुपारी पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात या हंगामातील पहिलाच पाऊस कोसळला. कोंढा कोसरा परिसरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले आहे. पºहे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने कामे ठप्प झाली आहे. एकदा दमदार पाऊस बरसतो आणि रोवणीला सुरूवात होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात केवळ २८ मिमी पाऊस
भंडारा जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात केवळ २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २८ जून या कालावधीत १८२.६ मिमी पावसाची सरासरी आहे. मात्र आतापर्यंत केवळ २८ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत १४५.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६०.६ मिमी, मोहाडी ४६.४ मिमी, तुमसर ४९ मिमी, साकोली ४.६ मिमी, लाखनी ३५.२ मिमी पावसाची नोंद झाली तर गत २४ तासात जिल्ह्यात ४.८ मिमी पाऊस कोसळला.
पवनी, लाखांदूर तालुके निरंक
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असली तरी पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अद्यापही पाऊस कोसळला नाही. या तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे. आकाशात ढग येतात. मात्र निघून जातात. या दोन तालुक्यावर वरूणराजा रूसल्याचे दिसत आहे.